विकासाच्या नावाने मूर्ख बनविले जातेय

विकासाच्या नावाने मूर्ख बनविले जातेय

लातूर - आज सत्ताधाऱ्यांना प्रश्‍न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरविले जात आहे. जात, धर्म, वंश, प्रांत, भाषा यावरून समाजामध्ये विघटन केले जात आहे, हे पूर्णतः चुकीचे आहे. कायद्याचा लाभ समाजातल्या सर्व घटकांना मिळायला हवा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. देशाचे धोरण ठरविताना शेवटच्या माणसाचा विचार अगोदर व्हावा, अशी राष्ट्रपिता महात्मा गांधींची अपेक्षा होती. आज मात्र विकासाच्या नावाने लोकांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान सुरू आहे, अशी खरमरीत टीका गांधी विचारांचे अभ्यासक व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी येथे केली.

येथील विद्यार्थ्यांच्या साहाय्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विद्यार्थी सहायक मंडळाचे रविवारी (ता. पाच) श्री. गांधी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी ते ‘‘२१ व्या शतकाची आव्हाने आणि गांधी विचार’ या विषयावर बोलत होते.

आज चौकाचौकांत देशभक्ती शिकविली जात असली, तरी आपला समाज सर्वाधिक विघटित समाज आहे. या समाजात जातीपातींचे प्राबल्य आहे. विविध प्रादेशिक, आर्थिक आणि धार्मिक विचारांच्या दऱ्या आहेत. देशाच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचीच अशी वाटणी झाली आहे. फक्त चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळेसच आम्हाला देशभक्ती आठवते.

आजकाल सरदार पटेल यांची स्तुती करण्याची फॅशन आली आहे आणि बापू मात्र भिंतींची शोभा होऊन बसले आहेत. आम्ही गांधी मार्गाचा शोधच घेण्याचे विसरून चाललो आहोत. गांधी मार्गाचा शोध आपल्या अंतरात्म्यातून घेतला गेला पाहिजे. बापूंनी आपल्यामधील कमजोरी ओळखली आणि त्यावर मात केली. तेव्हा बापू समजण्यासाठी त्यांना तसबिरीतून काढून त्यांचा आरसा बनविल्याशिवाय आपण तो मार्गच शोधू शकत नाही, असे ते म्हणाले.

महात्मा गांधी ही भूतकाळात घेऊन जाणारी व्यक्ती नव्हती, तर इंजिनासारखी पुढे खेचून नेणारी शक्ती होती. उद्योगविश्‍वाच्या भ्रामक कल्पना मांडून आपल्या कोपराला गूळ लावण्याचा प्रयत्न आज होतो आहे; पण बापूंचा कुटिरोद्योग हाच ग्रामीण भागातल्या कारागिरांना श्‍वास देणारा मंत्र होता, असे ते म्हणाले.

चरखाधारी मोदी...
चरखाधारी मोदींच्या अंगावरची खादी ही गांधीजींची खादीच नव्हे, बापूजींची खादी गोरगरिबांच्या झोपडीत कातली जाणारी होती. या खादीचे व्रत आपण घेतले पाहिजे. लालू प्रसाद यादवांनी रेल्वेमंत्री असताना प्रवाशांना चहासाठी कुल्हड आणि खादीच्याच चादरी वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा तो प्रयास लाखो कारागिरांना रोजगार देऊन गेला. आधुनिक उद्योगाला या ग्रामीण कारागिरीची जोड दिली तरच बापूंच्या स्वप्नातील समृद्ध भारत देश आकार घेऊ शकेल, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com