निर्माल्यापासून तयार होणार खत , लातूर महापालिकेचा पुढाकार

सुशांत सांगवे
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

लातूर शहरात पाण्याचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच निर्माल्यापासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व प्रभागांतील घराघरांमधील आणि गणेश मंडळांकडील निर्माल्य जमा करून त्यातून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरात दररोज सकाळी पालिकेची वाहने फिरत आहेत, तर शुक्रवारपासून (ता.सहा) सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळांत फिरून शहरातील निर्माल्य जमा केले जाणार आहे. 

लातूर : शहरात पाण्याचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच निर्माल्यापासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व प्रभागांतील घराघरांमधील आणि गणेश मंडळांकडील निर्माल्य जमा करून त्यातून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरात दररोज सकाळी पालिकेची वाहने फिरत आहेत, तर शुक्रवारपासून (ता.सहा) सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळांत फिरून शहरातील निर्माल्य जमा केले जाणार आहे. 

दुष्काळ असला तरी गणेशोत्सवाला आनंददायी वातावरणात नुकतीच सुरवात झाली आहे; पण शहरात पाण्याचा तुटवडा आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पालिकेने श्रींच्या मूर्तीबरोबरच निर्माल्यही दान करा, असे आवाहन केले आहे. निर्माल्य दान करण्यासाठी लातूरकरांचा पालिकेला आतापासून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालिकेने शहरात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेत वाहने फिरवून निर्माल्य जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

विसर्जनाच्या ठिकाणी अनेकजण मूर्तींबरोबरच अकरा दिवसांचे निर्माल्यही पाण्यात टाकतात. दरवर्षी हे चित्र पाहायला मिळते म्हणून आधीच निर्माल्य जमा केले जात आहे. यासंदर्भात उपायुक्त वसुधा फड म्हणाल्या, शहरातील 18 प्रभागांत 18 वाहने दररोज सकाळी फिरत आहेत आणि निर्माल्य जमा करत आहेत. अशाच पद्धतीने संध्याकाळीही निर्माल्य जमा केले जाणार आहे. या वाहनांवर प्रत्येकी एक कर्मचारीही आम्ही नेमला आहे.

याशिवाय, घंटागाडीतही निर्माल्य जमा करण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे. जमा झालेले निर्माल्य कचऱ्यात न टाकता त्यापासून खत तयार केले जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य गोळा करण्यासाठी जास्त वाहने शहरात फिरतील. 

गणपतीला वाहिलेले हार, फुले, दूर्वा असे साहित्य नागरिकांनी पाण्यात टाकू नये. शिवाय, गणेशमूर्ती पाण्यात टाकून विसर्जन करण्याऐवजी त्या पालिकेला दान कराव्यात. शहरात पाण्याचा तुटवडा असल्याने प्रत्येकानेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा. 
- वसुधा फड, उपायुक्त, महापालिका 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur munciple corporation to make fertlisers from nirmalya