दिग्गजांना मतदारांनी दाखविले अस्मान!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी ऐतिहासिक कौल देत सत्तांतर घडवून आणले. त्यासोबत विद्यमान २५ नगरसेवकांना नाकारण्याचे धाडस दाखवून नवख्या चेहऱ्यांना संधी दिली. विजयी उमेदवारांत काही माजी नगरसेवकांचा समावेश झाला तर मतदारांनी काही माजी महापौर, माजी नगराध्यक्षांसह माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवून दिला.

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी ऐतिहासिक कौल देत सत्तांतर घडवून आणले. त्यासोबत विद्यमान २५ नगरसेवकांना नाकारण्याचे धाडस दाखवून नवख्या चेहऱ्यांना संधी दिली. विजयी उमेदवारांत काही माजी नगरसेवकांचा समावेश झाला तर मतदारांनी काही माजी महापौर, माजी नगराध्यक्षांसह माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवून दिला.

महापालिकेच्या निवडणुकीला आरंभ होताच काँग्रेससह भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व रिपाइंच्या दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. त्यात माजी महापौर, माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवकांसह विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी काही जणांना उमेदवारी मिळाली. काहीजण निवडून आले, तर काहींना अस्मान दिसले. निवडून आलेल्या विद्यमान नगरसेवकांपेक्षा पराभूत नगरसेवकांची संख्या जास्त आहे. राजकीय पटलापासून दूर असलेले तत्कालीन नगरपरिषदेचे सदस्यही निवडून आले आहेत. त्यामुळे राजकारणात नेहमी बदल होत असतो. कोणीच कायम राहत नसतो, हेच मतदारांनी दाखवून दिले. परिणामी नवख्या उमेदवारांनी चमकदार कामगिरी करून स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले आहे.

महापालिकेच्या विजयी नगरसेवकांत काँग्रेसचे महापौर ॲड. दीपक सूळ, माजी उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी सभापती बालासाहेब देशमुख, गटनेते रवीशंकर जाधव, नगरसेविका पूजा पंचाक्षरी, उषा भडीकर, सपना किसवे, योजना कामेगावकर विजयी झाले. भाजपत गेलेले माजी उपमहापौर सुरेश पवार, शैलेश स्वामी, ज्योती आवसकर, रिपाइंतून काँग्रेसमध्ये गेलेल्या दीप्ती खंडागळे, राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या रेहाना बासले निवडून आल्या, तर राष्ट्रवादीचे विजयी झालेले एकमेव नगरसेवक राजा मणियार आहेत. काँग्रेसच्या माजी महापौर स्मिता खानापुरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, नगरसेवक किशोर राजुरे, गिरीश पाटील, रमेशसिंह बिसेन, असगर पटेल, पंडित कावळे, अनुप मलवाडे, अंजली चिंताले, कविता वाडीकर, शाहेदाबी जमील शेख, शशिकला यादव, कल्पना भोसले, दीपिका बनसोडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेतेमकरंद सावे, नगरसेवक विनोद रणसुभे, इर्शाद तांबोळी, राजेंद्र इंद्राळे, दीपाली इंद्राळे पराभूत झाले. राजेंद्र इंद्राळे व दीपाली इंद्राळे हे वडील व मुलगी असे निवडून आले होते; पण त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे विष्णुपंत साठे, सुनीता चाळक, संध्या आरदवाड यांना मतदारांनी सहारा दिला नाही. शिवसेनेतून भाजपत गेलेले रवी सुडे व राष्ट्रवादीत गेलेले संभाजी बसपुरे यांनाही पराभूत व्हावे लागले. रिपाइंचे चंद्रकांत चिकटे सत्तेच्या खेळातून बाद झाले आहेत.

तत्कालीन नगरपरिषदेचे सदस्य राहिलेले माजी नगरसेवक देविदास काळे, अजय कोकाटे व दीपा गित्ते भाजपकडून निवडून आले. माजी नगरसेवक विजयकुमार साबदे, अशोक गोविंदपूरकर व ओमप्रकाश पडिले काँग्रेसमधून निवडून आले. माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे, अनिल गायकवाड, अनसूया सुदावळे, मीना सूर्यवंशी, राजकुमार आकनगिरे, बबन देशमुख, अर्चना आल्टे, प्रदीप चिद्रे व नेताजी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला. विजयी व पराभूत उमेदवारांच्या यादीत अनेक माजी पदाधिकाऱ्यांच्या पत्नी, आई, भावजय व नातेवाइकांचा समावेश आहे. राजकारणात सक्रिय राहू इच्छिणाऱ्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना ममतदारांनी नाकारले, हेच सत्य आहे.

Web Title: latur municipal corporation