लातूर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात झाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईवर ऑनलाइन अर्ज भरून ते प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया मंगळवार (ता. 28) वगळता तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

आयुक्त पवार म्हणाले, की महापालिका निवडणुकीसाठी आयोगाच्या बेवसाईटवर सकाळी 11 ते दुपारी दोनपर्यंत अर्ज भरता येतील. तसेच दुपारी तीनपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करता येणार आहेत. ही प्रक्रिया रविवारसह (ता. दोन) तीन एप्रिलपर्यंच सुरू राहणार आहे. त्यानंतर पाच एप्रिलला सकाळी 11 पासून अर्जांची छाननी होईल. सात एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आठ एप्रिल रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्‍यकता भासल्यास 19 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येईल. 21 एप्रिल रोजी सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर केला जाईल, असे आयुक्त पवार यांनी सांगितले. 

महापालिकेच्या क्षेत्रात दोन लाख 77 हजार 774 मतदार असून, एकूण 18 प्रभागांतून 70 नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक याप्रमाणे भवानजी आगे, कमलाकर फड, भाऊसाहेब जाधव, प्रवीण फुलारी, शोभादेवी जाधव, रामेश्वर रोडगे या सहाजणांची नियुक्ती झाली आहे. प्रशासनाने बुथनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली. या प्रसंगी उपायुक्त संभाजी वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते. 

आचारसंहितेसाठी स्वतंत्र पथके 
महापालिका निवडणूक प्रक्रियेस सोमवारी सुरवात झाली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मतदार जागृतीसाठी प्रयत्न केले जात असून, यात सामाजिक संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी व पथके स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Latur Municipal Corporation to begin the process of filing nominations