उमेदवारांची अजूनही धाकधूक... खुन्नस वाढली!

उमेदवारांची अजूनही धाकधूक... खुन्नस वाढली!

लातूर - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 850 उमेदवारी अर्ज दाखल झाले. कॉंग्रेस व भाजपत मोठी स्पर्धा दिसून आली. परिणामी पक्षाने नेमकी कोणाला उमेदवारी दिली यासंदर्भात संभ्रम वाढला. पक्षाचा अधिकृत व पर्यायी उमेदवार कोण, हे न समजल्याने उमेदवारांत धाकधूक आहे. त्यामुळे पक्षांतर्गत एकमेकांची खुन्नस काढण्याचे प्रकार घडले.

महापालिकेच्या 18 प्रभागांतून निवडून द्यावयाच्या 70 जागांसाठी सोमवारी (ता. तीन) दुपारी तीनपर्यंत एकूण 850 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांची बुधवारी (ता. पाच) सकाळी 11 वाजता छाननी होणार आहे. त्यानंतर राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची नावे कळण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस व भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व परिवर्तन आघाडीने जास्तीत जास्त प्रभागांत उमेदवार दिले. त्यासाठी उमेदवारांची पळवापळवी केली. सर्वच पक्षांनी पक्षांतर्गत नाराजी व बंडखोरी टाळण्यासाठी मोहिमा राबविल्या. त्यामुळे सोमवारी दिवसभर गडबड व गोंधळ होता. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन व प्रत्यक्ष स्वरूपात स्वीकारले.

मात्र, राजकीय पक्षांचे ए-बी फॉर्म ऑफलाइन घेण्यात आले. त्यासाठी सोमवारी दुपारी तीनपर्यंत मुदत होती. मात्र, मुदतीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ए-बी फॉर्म प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. स्वपक्षातील व इतर पक्षांच्या इच्छुक उमेदवारांवर पाळत ठेवूनही काहीजणांनी झोल दिल्याने दिग्गज पक्षांना उमेदवारच देता येणार नसल्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे काही उमेदवारांचे ए-बी फॉर्म मुदतीनंतर जोडण्यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी राजकीय पदाधिकारी, प्रशासन व पोलिस दलाचा अप्रत्यक्ष वापर केला गेला.

राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना अपेक्षित प्रभाग न मिळाल्याने उमेदवारांत अस्वस्थता आहे. काही बड्या राजकीय नेत्यांना उमेदवारी नाकारल्याने एकमेकांवर खुन्नस काढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यास आळा घालून निवडणुका जिंकण्याचे नेत्यांसमोर आव्हान आहे.

भाजपचा संचालक कोण...?
कॉंग्रेस व भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा होती. कॉंग्रेसने विद्यमान नगरसेवकांसह चर्चेतील बड्या नेत्यांना डावलले. उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपत गेलेल्यांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे ते प्रत्यक्ष निवडणुकीत काय भूमिका घेतात, यावरच भाजपचे यश अवलंबून आहे. भाजपत पक्षातील नेत्यांना किंमत न देता एक-दोन व्यक्तींनी उमेदवार निश्‍चित केले. त्यामुळे पडद्याआडचा भाजपचा तो संचालक कोण? असा कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com