हेलिकॉप्टर अपघातानंतर मुख्यमंत्री निलंग्यातून मुंबईकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

  • दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री निलंग्याहून लातूरला दाखल.
  • लातूर विमानतळाहून मुंबईकडे रवाना. 

लातूर : निलंगा तालुक्‍यातील 'शेतकरी संवाद' कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. 25) दुपारी 12 च्या सुमारास मुंबईकडे परत जाताना उड्डाण केलेले हेलिकॉप्टर लगेच खाली कोसळले. हेलिकॉप्टर विजेच्या खांबाला धडकून हा अपघात झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्वजण सुखरूप असून, मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करून व व्हीडीओ मेसेज देऊन जनतेच्या आशीर्वादाने कुठलीही इजा झाली नसल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी (ता. 24) सायंकाळी जिल्ह्यात आले होते. गुरूवारी सकाळी जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी, श्रमदान व शेतकरी संवाद कार्यक्रम आटोपून ते निलंग्याला पोचले. निलंगा येथून हेलिकॉप्टरने मुंबईला निघाले. दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरचे उड्डाण होताच ते पुन्हा जमिनीच्या दिशेने खाली येताना दिसले. हेलिकॉप्टरचा पंखा विजेच्या तारेला अडकल्याने ते ट्रकवर आदळून कोसळले. त्यांच्यासोबत प्रधान सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहायक अभिमन्यू पवार व पायलट होते. ते सर्वजण सुखरूप आहेत. पोलिस दल व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वांना बाहेर काढून पालकमंत्री निलंगेकर यांच्या घरी नेले. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली असून, कुठलीही ईजा झाली नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून व्हीडीओ मेसेज जारी केला. महाराष्ट्रातील 11 कोटी 220 लाख जनतेच्या आशीर्वादाने सुखरूप असून, काळजी करण्यासारखे काही नाही. आपले असेच प्रेम राहू द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री निलंग्याहून लातूरला आले व लातूर विमानतळाहून मुंबईकडे निघणार आहेत.

Web Title: latur news after chopper accident cm devendra fadnavis leaves for mumbai

फोटो गॅलरी