लातुर शहरात बसवर दगडफेक; तीन प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

घटनेनंतर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून भीमा - कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ एकत्र आलेल्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान एका घटनेचा अपवाद सोडला तर जिल्ह्यात शांतता असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले

लातूर - भीमा - कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेचे पडसाद शहरात सकाळपासून उमटायला सुरवात झाली. शहरातील सम्राट चौक ते गुळ मार्केट रस्त्यावर लातूर आगाराच्या बसवर मंगळवारी सकाळी दगडफेक झाली. या घटनेत तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रमुख  रस्त्याकडेच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

भीमा - कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सम्राट चौक ते गुळमार्केट दरम्यान सकाळी युवकांचा जमाव एकत्र आला. या जमावाने बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करतच तेथून जात असलेल्या बसवर जमावातील एकाने दगड मारला. या बसची समोरील काच फुटून दगड आतील प्रवाशांना लागला. यात तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले. त्यानंतर रस्त्याच्या कडेच्या व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली दुकाने बंद करण्यास सुरवात केली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले.

घटनेनंतर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून भीमा - कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ एकत्र आलेल्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान एका घटनेचा अपवाद सोडला तर जिल्ह्यात शांतता असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले.  

Web Title: latur news: agitation marathwada