मुलाचा वाढदिवस साजरा केला स्वच्छतागृहामध्ये!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

हलगरा गावाची पाणंदमुक्तीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिर, ओव्हीबीआई संस्थेतर्फे 22 हजार रुपये खर्चून उच्च दर्जाचे स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे

औराद शहाजानी - लातूरमधील हलगरा (ता. निलंगा) या गावात पाणंदमुक्तीसाठी नागरिक सरसावले आहेत. अजय रावण सगरे यांनी आपला मुलगा अजिंक्‍य याचा सहावा वाढदिवस 15 ऑक्‍टोबर रोजी नवीन बांधलेल्या स्वच्छतागृहात साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे गावकरी अजय सगरे यांचे अभिनंदन करत आहेत.

स्वच्छतागृहाच्या वापरासाठी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे अजय सगरे यांनी सांगितले. हलगरा गावाची पाणंदमुक्तीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिर, ओव्हीबीआई संस्थेतर्फे 22 हजार रुपये खर्चून उच्च दर्जाचे स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे.

जवळपास प्रत्येक व्यक्ती पूजा करून त्याचा वापर करायला सुरवात करत आहे, असे ओव्हीबीआई संस्थेचे प्रतिनिधी अमित देशमुख यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांत 52 लोकांनी संस्थेकडून स्वच्छतागृह बांधायला वैयक्तिक पाच हजार रुपयांचा वाटा दिला आहे. हलगरा येथे 1400 कुटुंबांपैकी 950 कुटुंबांकडे स्वच्छतागृह असून सर्व वापरात आहेत, तर 450 कुटुंबांनी बांधकाम सुरू केलेले आहे.

Web Title: latur news: birthday