राज्यात वादमुक्त विश्वस्त संस्था अभियान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

लातूर - राज्यातील हजारो सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांतील विश्वस्तांत वाद आहेत. वर्षांनुवर्षे हे वाद सुरू आहेत. त्याचे परिणाम लक्षात घेता राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आता वादमुक्त विश्वस्त संस्था अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. पहिल्यांदा सांगून हे वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, यातून मार्ग नाही निघाला तर कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे; पण या संस्थांचे कार्य व्यवस्थितरीत्या कसे सुरू होईल, हे या अभियानातून पाहिले जाणार आहे. 

राज्यात अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांमधील विश्वस्तांमध्ये वाद आहेत. या वादामुळे त्या-त्या संस्थेमधील कर्मचारी, विद्यार्थी, भाविक यांचे मोठे नुकसान होत आहे. वादामुळे संस्थांचे भवितव्यच धोक्‍यात आले आहे. याची हजारो प्रकरणे राज्यातील धर्मादाय कार्यालयात प्रलंबित आहेत. हे लक्षात आल्यानंतर धर्मादाय कार्यालयानेच आता पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याने डिगे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक धर्मादाय सहआयुक्तांनी त्यांच्या विभागातील वाद असलेल्या संस्थांची यादी तयार करण्याचे आदेश डिगे यांनी दिले आहेत. धर्मादाय उपायुक्त व सहायक धर्मादाय आयुक्तांकडून माहिती घेऊन धर्मादाय सहआयुक्तांनी हे वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आदेश डिगे यांनी दिले आहेत. 

शिक्षण संस्थांतील वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गरिबांच्या पैशावर धार्मिक संस्थांतील विश्वस्तांत भांडणे आहेत. यात राज्यातील मोठ्या संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे हे अभियान राबविले जाणार आहे. यात दोन्ही बाजूंच्या विश्वस्तांना बोलावून घेऊन नियमानुसार वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर मात्र कायदेशीर बाजू तपासून कारवाई केली जाणार आहे. 
- शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्त. 

झिरो पेंडन्सी अभियान 
दरम्यान, राज्यातील धर्मादाय कार्यालयातील विनावाद बदल अर्ज निकाली काढण्यासाठी ता. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राज्यात झिरो पेंडन्सी अभियान राबविण्याचे आदेश डिगे यांनी दिले आहेत. बदल अर्ज प्रलंबित असल्याने न्यासाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रलंबित सर्व अर्ज निकाली काढून त्याचा दर आठ दिवसांनी अहवाल सादर करावा, असे आदेशही डिगे यांनी दिले आहेत.

Web Title: latur news Charity Commissioner Shiv Kumar Dighe