डॉ. निलंगेकरांचा कॉंग्रेसला घरचा आहेर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

लातूर - कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार त्यांना पूर्वीपासूनच चुकीचा सल्ला देत आहेत. सल्लागारांमुळेच श्रीमती गांधी यांना चुकीचे निर्णय घ्यावे लागले. या सर्व सल्लागारांच्या तक्रारी आल्याने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी निश्‍चितच बदल करतील, अशी आशा व्यक्त करीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पक्षातील सल्लागारांवर शनिवारी (ता. 28) तोफ डागत पक्षाला घरचा आहेर दिला. या स्थितीत मध्यंतरी महसूलमंत्रिपदी झालेली आपली निवड मात्र सोनिया गांधी यांनी सल्लागारांच्या सल्ल्याने नव्हे, तर स्वतः केली होती, असा खुलासा करायला ते विसरले नाहीत. 

येथे पत्रकार परिषदेत डॉ. निलंगेकर यांनी विविध विषयांना स्पर्श केला. भारतीय जनता पक्षावर टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वेळी लक्ष्य केले. नरेंद्र मोदी यांची पक्षात व सरकारमध्ये हुकूमशाही सुरू आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी वाळीत टाकले आहे. त्यांना विचारले जात नाही किंवा त्यांच्यासोबत विचारविनिमय केला जात नाही. कॉंग्रेस पक्षात मात्र असे होत नाही. कॉंग्रेसच्या कोअर कमिटीत वरिष्ठांची नियुक्ती केली जाते व त्यांचा सल्ला विचारात घेतला जात असल्याचे डॉ. निलंगेकर यांनी सांगितले. राज्य व केंद्रातील भाजपच्या सरकारने चुकीचे निर्णय घेतल्याने लोकांना त्याचा फटका बसत आहे.

कर्जमाफी न देता शेतकऱ्यांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले जात आहे. मागच्या सरकारवर खापर फोडत सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या जबाबदारीपासून दूर जाता येणार नाही. नोटाबंदी करण्यापूर्वी भांडवलदारांना जुन्या नोटा बदलून घेण्याची संधी दिली. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर निवडणुकांतील खर्च केला जात आहे. सोयाबीनला हमीभाव दिला जात नाही. जिल्ह्यासाठी केवळ दोन खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतीसाठी बारा तास वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरली आहे. बुलेट ट्रेनऐवजी सरकारने राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी. सरपंचांप्रमाणेच पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून करावी. जीएसटीमधील त्रुटी दूर कराव्यात आदी मागण्या करीत मराठा व मुस्लिमांना दिलेल्या आरक्षणासाठी वेळकाढूपणाचे धोरण ठेवले जात असल्याची टीका डॉ. निलंगेकर यांनी केली. 

नातवाच्या कौतुकाला बगल 
नातू व पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या कामाबद्दल पक्षाचा नेता व आजोबा म्हणून काय वाटते, हे सांगताना डॉ. निलंगेकर यांनी पक्षाचीच भूमिका वारंवार रेटत नातवाच्या कौतुकाला बगल दिली. राजकारण व नाते वेगळे असल्याचे सांगताना त्यांनी पुराणातील कौरव-पांडव; तसेच कंस व कृष्णाचा दाखलाही दिला. मी निलंगा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला असून जास्त काळ वापरल्याने फाटलेल्या शर्टासारखी मतदारसंघाची स्थिती झाल्याचे ते म्हणाले. लातूरच्या लोकांनी पैसे दिल्यानेच माझा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. सास्तूर गावाचे त्यात मोठे योगदान असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

Web Title: latur news congress