जावेचा पेटवून खून करणाऱ्या महिलेला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

लातूर - शेताच्या वादावरून झालेल्या भांडणानंतर चुलतजावेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी दवणगाव (ता. रेणापूर) येथील नंदाबाई गुणवंत नागरगोजे हिला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी हा निकाल दिला.

लातूर - शेताच्या वादावरून झालेल्या भांडणानंतर चुलतजावेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी दवणगाव (ता. रेणापूर) येथील नंदाबाई गुणवंत नागरगोजे हिला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणाची अतिरिक्त शासकीय अभियोक्ता विठ्ठल व्ही. देशपांडे बोरगावकर यांनी दिलेली माहिती अशी ः दवणगाव येथील मुक्ताबाई सायस नागरगोजे यांच्या शेजारी तिची चुलतजाऊ नंदाबाई गुणवंत नागरगोजे व गुणवंत छगन नागरगोजे हे राहत होते. मुक्ताबाई (वय २२) व नंदाबाईमध्ये (वय ३०) २३ ऑगस्ट २००९ रोजी दुपारी शेताच्या कारणावरून भांडण झाले. भांडणानंतर मुक्ताबाई घरात गेली. घरात जाऊन ती लहान मुलीला दूध गरम करण्यासाठी चिमणी पेटवून चूल पेटवत होती. या वेळी नंदाबाईने मुक्ताबाईच्या अंगावर रॉकेल टाकले व पेटलेल्या चिमणीला लाथ मारली. यात पेटती चिमणी मुक्ताबाईच्या अंगावर पडली व अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने ती जळाली. या घटनेत गंभीर भाजलेल्या मुक्ताबाईला तातडीने अंबाजोगाई (जि. बीड) येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 उपचार सुरू असतानाच मुक्ताबाईचा ३० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. मुक्ताबाईचे पती सायस भानुदास नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रेणापूर पोलिसात नंदाबाईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नंदाबाईला अटक करून तिच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जोशी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

यात तेरा साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. त्यापैकी दवणगाव येथील सर्व साक्षीदार व पंच फितूर झाले. मात्र, मृत मुक्ताबाईने तिच्या वडिलांना दिलेला तोंडी मृत्युपूर्व जबाब, नायब तहसीलदार व पोलिसांकडे दिलेला मृत्युपूर्व जबाब तसेच अतिरिक्त शासकीय अभियोक्ता देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नंदाबाईला मुक्ताबाईच्या खूनप्रकरणी दोषी धरले. त्यावरून न्यायालयाने नंदाबाईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात ॲड. देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना ॲड. मोहन सिरसाट व न्यायालयीन पैरवीकार सहायक पोलिस उपनिरीक्षक शाहूराज कांबळे यांनी साह्य केले.     

मृत्युपूर्व जबाब महत्वाचा
जावेने पेटवून दिल्यानंतर गंभीर भाजलेल्या मुक्ताबाईला उपचारासाठी वाहनाने अंबाजोगाईला नेत असताना वाटेत तिने वडील भास्कर दत्तू मुंडे व आईला घडलेली घटना सांगितली. नंदाबाईने अंगावर रॉकेल टाकून पेटत्या चिमणीला लाथ मारून पेटवल्याचे मुक्ताबाईने सांगितले. असाच जबाब मुक्ताबाईने अंबाजोगाईचे नायब तहसीलदार उदयकुमार शहाणे व पोलिस जमादार नवनाथ ढाकणे यांना दिला. हाच जबाब न्यायालयात महत्वाचा ठरला.

Web Title: latur news crime Life imprisonment for a woman