दुष्काळाचे सावट पसरल्याने पिकांचे पंचनामे करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

जळकोट - तालुक्‍यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तीळ ही नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. शिवाय पाणीटंचाईचे मोठे संकटही भविष्यात निर्माण होणार आहे.

जळकोट - तालुक्‍यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तीळ ही नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. शिवाय पाणीटंचाईचे मोठे संकटही भविष्यात निर्माण होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून दोन ते तीन वेळा तुरळक पाऊस सोडला, तर या तालुक्‍याला पावसाने वगळले. एकहंगामी व डोंगरी अर्वषणग्रस्त तालुक्‍यात मोठा दुष्काळ पडण्याची शक्‍यता असून शेतातील उभे पिके पूर्णपणे कोमेजून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. शिवाय नदी-नाले विहिरी, अद्यापही कोरडेठाक आहेत. तलावातील पाणी जोत्याखाली गेले आहे, तर अनेक तलावांत मृत जलसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाई संकटही भेडसावणार आहे. कधी या तालुक्‍यावर आसमानी संकट, तर कधी सुलतानी संकट येतच आहे. 

सध्याच्या पीकपरिस्थितीची महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण मोफत करावे, शेतकरी व शेतमजुराला दुष्काळदृश परिस्थिती पाहून मोफत धान्य वाटप करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

या तालुक्‍यातील बारा साठवण तलावांपैकी जळकोट, माळहिप्परगा, ढोरसांगवी, सोनवळा, करंजी, जंगमवाडी, डोंगरकोनाळी या तलावांतील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे; मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपत आले व ऑगस्ट अर्धा महिना संपत आला तरी पावसाने दडी मारलेली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

या तालुक्‍याचे एकूण क्षेत्रफळ ३४ हजार हेक्‍टर असून पंचवीस हजार हेक्‍टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस यांची पेरणी केली, तर दहा हजार हेक्‍टरवर जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे; परंतु दहा हजार हेक्‍टर सोयाबीन पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

एकीकडे शासन म्हणते कर्जमाफी सुरू आहे; मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. महाराष्ट्रात कर्जमाफी निर्णयानंतरही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचे सत्र थांबता थाबत नाही. याबाबत उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांच्याशी संपर्क केला असता पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना तालुक्‍यातील पीकपरिस्थितीची पाहणी करण्याच्या व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: latur news crop drought