महापालिकेची ढिलाई अन्‌ अतिक्रमणांनी घेरली गंजगोलाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

लातूर - शहर दिवसेंदिवस विस्तारत आहे. शहराची लोकसंख्याही वाढत आहे. त्यात रस्ते अरुंद आहेत. असे असताना रस्त्यावर होणारे अतिक्रमण हा मोठा प्रश्न बनत चालला आहे. येथील प्रमुख भाग असलेल्या गंजगोलाईचा परिसर तर अतिक्रमणयुक्त झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेने एकदाही या विरोधात मोहीम उघडलेली नाही. महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर तरी गंजगोलाई अतिक्रमणमुक्त होणार का? याकडे लक्ष लागले आहे. 

फुटपाथ झाले गायब; पिवळ्या पट्ट्यावर गाडे
शहरात ठिकठिकाणी फुटपाथ तयार करण्यात आले आहेत; पण अनेक ठिकाणी त्यावरच दुकाने थाटण्यात आली आहेत. गांधी चौकात तर हॉटेलचालकांच्या ताब्यातच हे फुटपाथ आहेत; तसेच गंजगोलाईकडे जाणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांच्या कडेला पिवळे पट्टे ओढण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर हे पट्टेच दिसत नाहीत. तर अनेक ठिकाणी या पट्ट्याच्या पुढेच हातगाडे उभे करण्यात आलेले आहेत.

फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी हवी
शहरात शेकडो फेरीवाले आहेत. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी ते फिरून वेगवेगळ्या वस्तू विकताना दिसतात; पण त्यांच्यासाठी महापालिकेकडून अद्याप काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. महापालिकेने फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. 

सहा महिन्यांत मोहीमच नाही
शहरात अतिक्रमण होणार नाही याची काळजी महापालिकेने घेतली पाहिजे. गेल्या सहा महिन्यांत एकही अतिक्रमणाच्या विरोधात एकही मोहीम महापालिकेने घेतली नाही. सत्ताबदलानंतर तरी अतिक्रमणे काढले जातील अशा अपेक्षा लातूरकरांना आहे; पण तसे होताना दिसत नाही. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अतिक्रमणांविरोधात मोहीम राबविली तीही आता थंडावली.

अतिक्रमणयुक्त  गंजगोलाई
शहराचा मुख्य भाग म्हणून गंजगोलाईकडे पाहिले जाते; पण सध्या ही गंजगोलाई अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. वेगवेगळे हातगाडेवाले, लहान-लहान व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटून गंजगोलाई अतिक्रमणयुक्त करून टाकली आहे. त्यामुळे गंजगोलाई अतिक्रमणमुक्त कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. 

शहरातील अतिक्रमणे काढणे ही सर्वांचीच भूमिका आहे. अतिक्रमणमुक्त शहर करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेकडून याकरिता मोहीमही हाती घेतली जाईल. दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत; तसेच फेरीवाले धोरणावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- सुरेश पवार, महापौर.

Web Title: latur news encroachment municipal corporation