शेतमालाची ‘हमी’ घेईना कुणी!

हरी तुगावकर 
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

लातूर - सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमाल हमी भावाप्रमाणेच खरेदी करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत; पण सध्या अडत बाजारात शेतमालाचे भाव पडलेले आहेत. येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत बाजारात सोमवारी (ता. ३०) झेंडा फिरविण्यात आला; पण सौदाच निघाला नाही. जिल्ह्यातील अकरा बाजार समित्यांची अशीच परिस्थिती आहे. शासनाची खरेदी केंद्रे नावालाच सुरू झाली आहेत; पण त्याचा उपयोग होत नाही. शेतमालाची ‘हमी’ घेईना ‘कोणी’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल आज पडून राहिला. यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे. यातून दहा कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे.

सोयाबीन, मूग, उडिदाची हमी भावानेच खरेदी करावी अन्यथा कारवाईचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी एका पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना दिला आहे. समित्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू करताच सोमवारी शेतमालाचा सौदाच निघाला नाही. बाजारच बंद राहिला. 

एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला. येथील अडत बाजारात रोज तीस हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक सोयाबीनची आहे. ओलावा जास्त असल्याने सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलला भाव आहे. सोयाबीनचा हमी भाव तीन हजार ५० रुपये आहे. मूग व उडिदाची आवक कमी आहे; पण त्यालाही हमी भावापेक्षा कमी भावच मिळतो. 

हमी भावानेच खरेदी करावी, असे आदेश असल्याने शेतमालाचा सौदाच निघाला नाही. व्यापाऱ्यांचा एक प्रकारे अघोषित बंदच राहिला. याचा परिणाम एकाच दिवशी एकट्या लातूर बाजार समितीच्या आवारात ५० हजार क्विंटल, तर इतर बाजार समित्यांत ५० हजार क्विंटल असा एकूण एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला आहे. 

व्यापारी व शासनही सोयाबीन खरेदी करीत नाही. यातून येथे दहा कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार ठप्प राहिले आहेत. शासनाच्या खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक क्विंटलही खरेदी झालेली नाही. त्यात बाजार बंद पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमी ना शासन घेईना, ना व्यापारी घेईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

फरकाची रक्कम द्यावी
यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. एकट्या लातूर बाजार समितीत दरवर्षी आक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत किमान पाच लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी-विक्री होते. शासनाच्या खरेदी केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणे अशक्‍य आहे. त्यामुळे शासनाने बाजारभाव व हमी भावातील फरकाची रक्कम देऊनच शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

बाजार समितीचे उपनिबंधकांना पत्र
सध्या बाजारात २५ ते ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. परतीच्या पावसामुळे या सोयाबीनमध्ये १८ टक्के ओलावा आहे. हे सोयाबीन एफएक्‍यूच्या दर्जाचे नाही. त्यामुळे याला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. शासनाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन घेऊन जावे याकरिता जागृती करण्यात येत आहे; तसेच सौद्याच्या वेळी देखील हमी भावानेच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे; पण जास्त ओलावा असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिला आहे. त्यामुळे हा सर्व माल पडून आहे. हमी भावाने शेतमाल विक्री होण्याच्या दृष्टीने त्रिस्तरीय समितीने विक्रीसाठी आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, सहायक निबंधक यांना सूचना देण्यात याव्यात; तसेच नॉन एफएक्‍यूचा माल खरेदी-विक्रीस परवानगी देणे योग्य राहील. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे तातडीने मार्गदर्शन करावे, असे पत्र बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांना लिहिले आहे.

Web Title: latur news farmer