लांबाटा संयुक्त वन व्यवस्थापन समिती राज्यात प्रथम

विकास गाढवे
गुरुवार, 22 मार्च 2018

प्रथम पारितोषिकाचा चौथ्यांदा मान
वनग्राम योजनेतील प्रथम पुरस्काराचा चौथ्यांदा मान जिल्ह्यातील समितीला मिळाला आहे. यापूर्वी शिराळा (ता. लातूर), देवर्जन (ता. उदगीर) व बडूर (ता. निलंगा) समितीला हा पुरस्कार मिळाला आहे. अंकोली (ता. लातूर) समितीला राज्यस्तरीय द्वितीय तर  दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहामुळे खास मराठवाड्यासाठी सुरू झालेला मराठवाडा पातळीवरील पुरस्कारही करकट्टा, शिराळा व ममदापूर (ता. लातूर) व लासोना (ता. अहमदपूर) समित्यांना मिळाला आहे. यातच लांबोटा समितीला मिळालेल्या पुरस्काराने जिल्ह्यातील वन विभागाची मान राज्यात पुन्हा उंचावली आहे.  

लातूर : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवडीतून योगदान देत लांबोटा (ता. निलंगा) गावाने राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. ग्रामस्थांनी वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण दूर करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे वन विभागाने हाती घेतलेल्या संत तुकाराम वनग्राम योजनेतून गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला सन 2016 - 2017 चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त मुंबईत बुधवारी (ता. 21) झालेल्या कार्यक्रमात समितीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

लोकसहभागातून वनक्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारने 2007  - 2008 पासून संत तुकाराम वनग्राम योजना हाती घेतली आहे. या योजनेत वनक्षेत्र असलेल्या गावात लोकांच्या सहभागातून संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली. यात वनक्षेत्राचे संरक्षण तसेच वाढीसाठी उल्लेखनीय काम केलेल्या समित्यांना जिल्हा व राज्यपातळीवर पातळीवर पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. वनग्राम योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात वन विभागाने जोरदार काम केले आहे. लांबोटा गावात पन्नास हेक्टर वन जमिनीचे क्षेत्र होते. त्यापैकी नऊ हेक्टरवर अतिक्रमण झाले होते. गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने हे अतिक्रमण वाद होऊ न देता दूर केले व त्या ठिकाणी वृक्षलागवड केली. याची दखल घेऊन समितीची 2016 - 2017 या वर्षासाठी राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे.

याच समितीची 2015 - 2016 या वर्षासाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. प्रथम पुरस्काराचे वितरण मुंबईत बुधवारी झाले. समितीचे पदाधिकाऱ्यांसह उस्मानाबादचे विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, सहायक वनसंरक्षक आर. जी. मुदमवार, निलंग्याचे वन परिक्षेत्र अधिकारी आय. एस. केंद्रे, वनपाल बालाजी मुदाळे व वनरक्षक दयानंद कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

प्रथम पारितोषिकाचा चौथ्यांदा मान
वनग्राम योजनेतील प्रथम पुरस्काराचा चौथ्यांदा मान जिल्ह्यातील समितीला मिळाला आहे. यापूर्वी शिराळा (ता. लातूर), देवर्जन (ता. उदगीर) व बडूर (ता. निलंगा) समितीला हा पुरस्कार मिळाला आहे. अंकोली (ता. लातूर) समितीला राज्यस्तरीय द्वितीय तर  दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहामुळे खास मराठवाड्यासाठी सुरू झालेला मराठवाडा पातळीवरील पुरस्कारही करकट्टा, शिराळा व ममदापूर (ता. लातूर) व लासोना (ता. अहमदपूर) समित्यांना मिळाला आहे. यातच लांबोटा समितीला मिळालेल्या पुरस्काराने जिल्ह्यातील वन विभागाची मान राज्यात पुन्हा उंचावली आहे.  

Web Title: Latur news forest management award