गंजगोलाईने घेतला मोकळा श्वास

अनधिकृत विक्रेत्यांवर आणि बेशिस्त वाहनचालकांवर प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे कुठलीही कारवाई न होतासुद्धा गंजगोलाईतील रस्ते वाहनांसाठी मोकळे झाल्याचे शनिवारी पाहायला मिळाले.
अनधिकृत विक्रेत्यांवर आणि बेशिस्त वाहनचालकांवर प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे कुठलीही कारवाई न होतासुद्धा गंजगोलाईतील रस्ते वाहनांसाठी मोकळे झाल्याचे शनिवारी पाहायला मिळाले.

लातूर: लातूरचे भूषण आणि शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई वर्षानुवर्षे अतिक्रमणांच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे सातत्याने या भागात वाहनांची कोडी अनुभवायला मिळते. दररोजचे हे चित्र शनिवारी (ता. नऊ) मात्र सर्वसामान्य लातूरकरांना पाहायला मिळाले नाही. येथील रस्ते चक्क नागरिकांसाठी खुले झाले. हा परिणाम आहे, पोलिस रस्त्यावर उतरल्याचा. या भागात अतिक्रमण करणारे बहुतांश विक्रेते गायब झाले. त्यामुळे गंजगोलाईला मोकळा श्वास घेता आला. 


अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याने शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गंजगोलाई भाग हा गजबजलेला असल्याने येथेही मोठ्या प्रमाणात पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. पोलिसांची वाहनेही गंजगोलाईच्या चारही बाजूंना उभी करण्यात आली होती.

गणेशोत्सव वगळता रस्त्यावर कधी नव्हे ते इतके पोलिस पाहून गंजगोलाईत अतिक्रमण करणाऱ्या बहुतांश विक्रेत्यांनी सण असतानाही आपली दुकाने रस्त्यावर थाटली नाहीत. त्यामुळे या भागातील रस्ते दिवसभर चक्क वाहनांसाठी मोकळे झाले होते. 
एरवी या भागातील रस्त्यांवर फळविक्रेते, भाजी विक्रेत्यांपासून एलईडी बल्ब, सीमकार्ड विक्रेत्यांपर्यंतचे स्टॉल लागलेले असतात.

काहीजण गाडे उभे करतात. तर काहीजण रस्त्यावर दुकान थाटतात. इतकेच नव्हे, तर भागातील अनेक दुकानदारही दुकानासमोर रस्त्यावर येऊन आपले साहित्य विकत बसतात. तर दुसरीकडे वाहनांच्या पार्किंगला कसलीही शिस्त नाही. या सर्व बाबींचा परिणाम या भागातील वाहतुकीवर होतो. कधी वाहतूक संथगतीने पुढे सरकत राहते, तर कधी ठप्प होते.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात; पण कसलीही कारवाई न होता शनिवारी या भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले. गंजगोलाईच नव्हे, तर गांधी चौक ते मुख्य बसस्थानकापर्यंतच्या पदपथावरील कपडे विक्रत्यांचे अतिक्रमणही गायब झाले होते. 

कधी लागणार शिस्त? 
महापालिकेचे आयुक्त म्हणून लातुरात आल्यानंतर जी. श्रीकांत यांनी गंजगोलाईतील अतिक्रमण काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि एका दिवसात गंजगोलाई साफ केली. 2017 मध्ये त्यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनीही गंजगोलाईत अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करीत हा परिसर मोकळा केला. त्यानंतर या भागात अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाईच झाली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या भागात अतिक्रमण वाढताना दिसत आहे. म्हणूनच वाहतूक कोंडीत अडकण्याचा अनुभव लातूरकरांना दररोजच अनुभवायला मिळत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com