‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ मिशनला अपंगाची साथ

‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ मिशनला अपंगाची साथ

चाकूर - देशात सध्या स्वच्छ भारत मिशनचे शासकीय स्तरावरून ‘मोसमी वारे’ जोरात वाहत आहे. प्रत्यक्षात अनेक गावात त्याला ‘कुंभारी वारे’ समजून घरी शौचालय असणारे लोटाबहाद्दर उघड्यावरच जात आहेत. अशा मनोवृत्तीच्या लोकांसमोर दोन्ही पायांनी अपंग असलेल्या रोहिणा (ता.चाकूर) येथील तरुणाने पत्नीच्या मदतीने स्वच्छतागृह स्वतः बांधून व वापर करून आदर्श निर्माण केला आहे. 

रोहिणा (अंबिका) येथील उद्धव नारायण केंद्रे हे (वय ३८ वर्ष) दोन्ही पायांनी अपंग आहेत. सन २०१५ मध्ये शेताच्या व घराच्या वाटणीवरून घरी कौटुंबिक भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने रागाच्या भरात त्यांनी गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या ५० फूट उंच टाकीवरून उडी मारली. त्यामुळे उद्धव यांचे दोन्ही पाय निकामी झाले. दगड-मातीचे घर त्यांच्या हिश्‍शाला आले असून, दारासमोर अंगण नाही तर शौचालय कोठे बांधणार? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी घरातच शोषखड्डा व स्वच्छतागृह खोली बांधली आहे. पत्नी सिंधूबाई यांनी आपल्या अपंग पतीला खोदकामात व बांधकामात मदत केली. हाताखाली विटा, सिमेंट, वाळू देणे तसेच खोदलेल्या खड्ड्यातील माती भरून काढणे, अशी कामे खांद्याला खांदा लावून अर्धांगिनी या नात्याने केली.

अडीच एकर हलक्‍या प्रतीची व कोरडवाहू शेती उद्धव यांच्या वाट्याला आली आहे. सतत पडणारा दुष्काळ, कमी प्रमाणात उत्पादित झालेल्या शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे ते अधिकच अडचणीत आले. त्यामुळे सिंधूबाईंना घरचे, शेतातील कामे व मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागतो. या दांपत्याला निकिता व गणेश ही दोन अपत्ये असून, ती इयत्ता नववी व पाचवी वर्गात शिकत आहेत. केंद्रे यांची धडपड पाहून गावातील दोन स्वस्त धान्य दुकानदार शामलाल काहेत व नामदेव केंद्रे यांनी प्रत्येकी २००० रुपये, तर पंचायत समिती उपसभापती वसंतराव डिगोळे यांनी २५०० रुपये मदत दिली. तर पोलीस पाटील फुलचंद केंद्रे यांनी २ पोती सिमेंट दिले. 

हलाखीची परिस्थिती व जाग्याची कमतरता असल्याने इच्छाशक्ती असूनही स्वच्छतागृह बांधू शकत नव्हतो. तरीही स्वच्छ भारत मिशनला सहकार्य करण्याचा दृढनिश्‍चय केला. गावातील दानशूर व्यक्तींनी व पंचायत समिती उपसभापती वसंतराव डिगोळे यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे मी, पत्नी व मुलांच्या साहाय्याने स्वच्छतागृह बांधकाम घरच्या घरी पूर्ण केले. या शौचालय बांधकामासाठी मिस्त्रीने ८ हजार रुपये मजुरी मागीतली होती.’
- उद्धव केंद्रे, रोहिणा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com