लिंगायत धर्मासाठी शहरात एल्गार

लिंगायत धर्मासाठी शहरात एल्गार

लातूर - ‘लिंगायत धर्म - स्वतंत्र धर्म’, ‘वब्ब लिंगायत - कोटी लिंगायत’च्या घोषणांनी लिंगायत समाजबांधवांनी आसमंत दुमदुमून टाकला. लिंगायत धर्माला स्‍वतंत्र धर्म म्‍हणून मान्यता द्यावी, या मागणीसाठी राज्यात पहिल्यांदा येथे रविवारी (ता. तीन) महामोर्चा काढून या समाजाने एल्गार पुकारला. अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने मोर्चेकऱ्यांत नवचैतन्य आले होते. यानिमित्ताने शहर भगवेमय झाले होते. लाखोंची संख्या असूनही अत्यंत नियोजनपूर्वक व शांततेत हा महामोर्चा निघाला.

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, लिंगायत धर्मीयांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या महामोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. या महामोर्चात बंगळूरच्या प्रथम महिला जगद्‌गुरू डॉ. माते महादेवी, भालकीचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, दिल्लीचे चन्नबसवानंद महास्वामी, कुडलसंगम कर्नाटकचे बसवजयमृत्युंजय महास्वामी, कोरणेश्वर अप्पाजी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. 

जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेला हा महामोर्चा शिवाजी चौक, बार्शी रोडमार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अत्यंत शांत व शिस्तीत हा मोर्चा निघाला.  महामोर्चात सहभागी समाजबांधव ‘भारत देशा-जय बसवेशा’, ‘जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय’, ‘लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळालीच पाहिजे,’ ‘आम्ही लिंगायत- आमचा धर्म लिंगायत’ अशा घोषणा देत होते. या महामोर्चात महिला व तरुणांची संख्या मोठी राहिली. महिलांच्या हातात मागण्यांचे फलक होते. ‘लिंगायत धर्म - स्वतंत्र धर्म’ असे लिहिलेल्या टोप्या, गमजे, टीशर्ट घालून तरुण मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

या आहेत प्रमुख मागण्या
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी 
लिंगायत धर्मीयांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे
राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे
वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद घ्यावी
लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी स्वतंत्र मंडळ वा प्रकल्पाची निर्मिती करावी.

स्वतंत्र धर्म म्हणून पुरावे 
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात लिंगायत धर्माची जनगणनेमध्ये स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करण्यात आल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत; तसेच लिंगायत हा एक अवैदिक धर्म असून, त्यातील आचरण पद्धती, तात्त्विक बैठक, परंपरा या हिंदू धर्मापेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून सिद्ध होतो. स्वतंत्र भारतामध्ये लिंगायत धर्माला संवैधानिक दर्जा न देऊन सरकारने लिंगायत धर्मीयांवर अन्याय केला आहे; तसेच अल्पसंख्याक असणारा लिंगायत समुदाय शासकीय लाभांपासून आजपर्यंत वंचित राहिला आहे. म्हणून यापुढे लिंगायत धर्माला संवैधानिक दर्जा देण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांकडे करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com