धर्मादाय संस्था घेणार सामूहिक विवाहासाठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

लातूर - गत काही वर्षांत विवाह समारंभातील अनावश्‍यक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक शेतकरी कुटुंबांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे धर्मादाय संस्थांनी आपल्या शिल्लक निधीतून शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या सामूहिक विवाहासाठी पुढाकार घ्यावा, अशी संकल्पना राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी मांडली. त्यांची ही संकल्पना उचलून धरत जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांनी सामूहिक विवाहासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली.

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या वतीने शनिवारी (ता. तीन) महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित मार्गदर्शन शिबिरात सामूहिक विवाहाच्या संकल्पनेला चालना मिळाली. धर्मादाय सहआयुक्त शशीकांत हर्लेकर, धर्मादाय उपायुक्त (लातूर) उषा चव्हाण, श्रीमती के. आर. सुपाते - जाधव (बीड), सहायक धर्मादाय आयुक्त एस. जी. कोरे (लातूर), के. ए. नहार (लातूर) व ए. टी. ठवरे (लातूर) यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात जिल्ह्यातील सर्व देवस्थान व शैक्षणिक संस्थांचे तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचे विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विवाह समारंभातील अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन सामूहिक विवाहाची संकल्पना सामाजात रुजविणे आवश्‍यक आहे. यात शेतकरी कुटुंबांची कुंचबना होत असून अशा गरजू कुटुंबांतील मुलामुलींच्या विवाहासाठी धर्मादाय संस्थांनी पुढाकार घेऊन शिल्लक निधीतून विविध सामाजिक उपक्रम घेतले पाहिजेत, अशी सूचना श्री. डिगे यांनी या वेळी केली. उपस्थित विश्वस्तांनी श्री. डिगे यांच्या या संकल्पनेचे कौतुक करून शेतकरी तसेच गरजू कुटुंबांतील मुलामुलींच्या सामूहिक विवाहासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली. या वेळी विश्वस्तांनी विविध अडचणी श्री. डिगे यांच्यासमोर मांडल्या. त्याला डिगे यांनी समर्पक उत्तरे देऊन कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. शिबिरात सहायक धर्मादाय आयुक्त कोरे यांनी सार्वजनिक विश्वस्त संस्था कायद्यातील नवीन तरतुदींची माहिती दिली. श्री. नहार यांनी ऑनलाइन संस्था नोंदणी व ऑडिट रिपोर्ट यावर सादरीकरण केले. धर्मादाय सहआयुक्त हेर्लेकर यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या आयोजनामागील हेतू सांगितला.

Web Title: latur news marathi news Charity Commissioner Shiv Kumar Dighe marriage