पेट्रोलपंपावरील दरोड्यातील आरोपीस दोन वर्षांनंतर अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

लातूर - रेणा पेट्रोलपंप व संकेत ढाबा येथे पडलेल्या दरोडा प्रकरणातील एका आरोपीस दोन वर्षांनी अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 

लातूर - रेणा पेट्रोलपंप व संकेत ढाबा येथे पडलेल्या दरोडा प्रकरणातील एका आरोपीस दोन वर्षांनी अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 

निवाडा (ता. रेणापूर) शिवारात ता. तीन ऑक्‍टोबर २०१५ रोजी रेणा पेट्रोलपंप व संकेत ढाब्यावर खुल्या जागेत मालवाहतूक करणारे ट्रकचालक ट्रक थांबवून आतमध्ये झोपले होते. रात्री एकच्या दरम्यान सहा चोरट्यांनी या ट्रकचालक, क्‍लीनर, संकेत ढाब्यावरील कामगार यांना चाकू, टॉमीने मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल असा वीस हजार सातशे रुपयांचा माल चोरून नेला होता. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण हा गुन्हा अद्याप उघडकीस आला नव्हता. या गुन्ह्याची फाईलही बंद करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड व अप्पर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी रेणापूर पोलिस ठाण्याला भेट दिली. उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. यात या प्रकरणाचा तपास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्याकडे दिला होता. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. यात हा गुन्हा चारठाणा येथील किरण सुभाष पवार याच्या टोळीने केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून ता. सात जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक परभणी जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. यात शनिवारी (ता. आठ) पोलिसांनी किरण सुभाष पवार (रा. चारठाणा) यास अटक केली. इतर आरोपी मात्र फरार झाले आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत. या सर्वांनी बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, सिरसाळा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केले आहेत. या गुन्ह्याची त्याने कबुली दिली असून दरोड्यातील मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. या आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता ता. १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके परभणीला रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: latur news marathwada crime