महापौरांच्या प्रतीकात्मक खुर्चीचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

लातूर - विजेचे बिल न भरल्याने शहरातील पथदिवे बंद आहेत. पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. लातूरकर अडचणीत असताना भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी दौरे करण्यातच मश्‍गुल आहेत. याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. १५) महापालिकेत महापौरांच्या प्रतीकात्मक खुर्चीचा लिलाव केला. तसेच महापालिकेत फिरून एका मडक्‍यात निधी गोळा करून तो प्रशासनाला सादर केला आहे. काँग्रेसच्या आंदोलनाची महापालिकेत दिवसभर चर्चा राहिली. दोन दिवसांत पथदिवे सुरू होतील असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

शहरातील विजेचा प्रश्न गेल्या पंधरा दिवसांपासून निर्माण झाला आहे. वीजबिल न भरल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. याचा पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. शहराच्या अनेक भागांतील पथदिवे बंद आहेत. सध्या मकरसंक्रांतीचा सण आहे. महिला रात्री उशिरापर्यंत हळदी-कुंकवासाठी बाहेर पडतात. पथदिवे बंद असल्याने या महिलांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, नगरसेवक इम्रान सय्यद, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, सचिन मस्के, रविशंकर जाधव, उषा कांबळे, दत्ता मस्के आदी सोमवारी दुपारी महापालिकेत आले. त्या वेळी महापौर सुरेश पवार, आयुक्त अच्युत हंगे उपस्थित नव्हते. 

नगरसेवकांनी महापौरांच्या प्रतीकात्मक खुर्चीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. एक खुर्ची घेऊन त्यांनी लिलावाची बोली बोलण्यास सुरवात केली. ४० रुपयांपासून ही बोली सुरू होती. दोन हजार रुपयांना नगरसेवक युनूस मोमीन यांनी शेवटची बोली बोलली. हा प्रकार पाहून सहायक आयुक्त कांबळे यांनी हस्तक्षेप करीत ही खुर्ची कर्मचाऱ्यांना नेण्यास सांगितली.

या आंदोलनानंतर ॲड. सूळ यांनी एक मडके खांद्यावर घेतले. हे सर्व नगरसेवक महापालिकेत सर्वत्र फिरले. कर्मचाऱ्यांकडून त्यांनी विजेच्या कामासाठी निधी गोळा केला. तो निधी प्रशासनाला सुपूर्द केला. या आंदोलनाची महापालिकेत दिवसभर चर्चा होती. दोन दिवसांत शहरातील पथदिवे सुरू होतील, असे लेखी उत्तर प्रशासनाच्या वतीने मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

महापालिका दररोज दहा ते बारा लाखांची कराची वसुली करीत आहे. असे असताना विजेचे बिल मात्र भरत नाही. याचा परिणाम महावितरणने वीज खंडित केली आहे. महापालिकेकडे नियोजन नाही. महापौर फक्त दौरे करीत आहेत. जबाबदारीची जाणीव नाही. पथदिवे सुरू झाले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
ॲड. दीपक सूळ, विरोधी पक्षनेता, महापालिका.

Web Title: latur news mayor electric bill