दूध खरेदी जुन्याच दराने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

भूम - शासनाने दुधाच्या दरात तीन रुपये प्रतिलिटर वाढ केली; मात्र यासंबंधीचा अध्यादेश स्थानिक दूध खरेदीदारांना मिळाला नसल्यामुळे जुन्याच दरात सर्रास दूध खरेदी सुरू आहे.

भूम - शासनाने दुधाच्या दरात तीन रुपये प्रतिलिटर वाढ केली; मात्र यासंबंधीचा अध्यादेश स्थानिक दूध खरेदीदारांना मिळाला नसल्यामुळे जुन्याच दरात सर्रास दूध खरेदी सुरू आहे.

तालुक्‍यात शेतीबरोबरच प्रमुख व्यवसाय म्हणून दूध उत्पादन आहे. तालुक्‍यात दररोज ८० ते ८५ हजार लिटर दूध उत्पादन होते. पूर्वी तालुका दूध संघ असताना १३८ सहकारी दूध संस्थांमार्फत दूध खरेदी केले जायचे; मात्र संघाच्या ढिसाळ कारभारामुळे संघ तोट्यात गेल्याने बंद पडला. दूध संघ बंद पडल्यानंतर सतत संघात संचालक म्हणून असणाऱ्या अनेक दुग्धसम्राटांनी दूध खरेदी सुरू केली आहे. तालुक्‍यात स्वतःचे दूध शीतकरण केंद्र कार्यान्वित करून तालुक्‍यातील दूध एजंटांमार्फत दूध खरेदी केली जात आहे. तालुक्‍यात ‘राजमाता’, ‘वारणा’, ‘कपिला’, ‘सुप्रिया’ आदी कंपन्यांकडून दूध खरेदी केले जात आहे. ४.० फॅट व ८.५ एसएनएफ आणि दुधाची उष्णता २९ अंश असणाऱ्या गाईच्या दुधाला २४ रुपये प्रतिलिटर भाव दिला जात आहे. तर म्हशीच्या दुधास २८ ते ३२ रुपये भाव मिळतो. सध्या अनेक दूध खरेदीदार संस्था दूध दरवाढीचा लाभ उत्पादकास देत नाहीत. याबाबत दुग्धशाळा व्यवस्थापकाशी (भूम) संपर्क साधला असता, शासनाकडून अद्याप दूध दरवाढीचा अध्यादेश जिल्हा निबंधक (दुग्ध) यांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्याच दरात बिल दिले जात असल्याचे सांगण्यात आले. शासनाने दूध दरवाढी केली असली, तरी अद्याप आमच्या हातात वाढ झालेले पेमेंट मिळत नसल्याचे दूध उत्पादक दगडू गाढवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: latur news milk