निम्न तेरणातून खरीप पिकांसाठी पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

लातूर - लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात गेला महिनाभर पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे खरिपाचे पीक धोक्‍यात आले आहे. याचा मोठा फटका दोन्ही जिल्ह्यांतील आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे. हे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तातडीने माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्पातून खरीप पिकासाठी डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी (ता. २) सायंकाळी हे पाणी कालव्यात सोडण्यात आले. 

पावसाळ्यात खरीप पिकासाठी कालव्यातून पाणी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पाण्यामुळे औसा, निलंगा, लोहारा व उमरगा या चार तालुक्‍यातील ७० गावातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. 

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात जूनचा पहिला पंधरवडा चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही झाल्या. लातूर जिल्ह्यात तर शंभर टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. पण गेल्या महिन्यापासून पावसाने मात्र पाठ फिरवली. त्यामुळे खरिपाचे पीकच धोक्‍यात आले आहे. पाण्याअभावी पिके माना टाकू लागली आहेत. दररोज पडत असलेल्या कडक उन्हामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढू लागली आहे. आधीच आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी खरिपाचे पीक हातून जाते की काय अशी भीती आहे. त्यात औसा, निलंगा, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा व उमरगा या तालुक्‍यातही पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या वर्षीच्या पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्प भरला होता. आजही या प्रकल्पात ५८ टक्के उपयुक्त साठा आहे. या प्रकल्पातून खरीप पिकांसाठी पाणी सोडावे अशी मागणीही होऊ लागली होती. परंतु पावसाळ्यात पिकासाठी पाणी सोडण्याचा इतिहासच नाही. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांची ही अडचण तातडीने ओळखली. श्री. निलंगेकर हे पालकमंत्र्यांसोबतच कालवा सल्लागार समितीचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने बैठक घेऊन जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निम्न तेरणा प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. बुधवारी सायंकाळी प्रकल्पातील पाणी कालव्यात सोडण्यात आले आहे. याचा औसा, निलंगा, लोहारा व उमरगा या चार तालुक्‍यांतील ७० गावांतील खरीप पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा ५२.७७६ दशलक्ष घनमीटर असून त्यापैकी चार दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता र. ना. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी वामन कांबळे, शाखाधिकारी योगिराज माने, राहुल भंडारे, ए. एस. कोळी, कृष्णा येनगे, अशोक सोनकांबळे पुढाकार घेत आहेत.

Web Title: latur news niman terna dam water