छडी घेवून दिल्लीतच रहा...

हरी तुगावकर
शनिवार, 24 मार्च 2018

संभाजी पाटील निलंगेकरांचा पाशा पटेल यांना `राजकीय` सल्ला

संभाजी पाटील निलंगेकरांचा पाशा पटेल यांना `राजकीय` सल्ला

लातूर: राज्याचे कामगार कल्याणंत्री व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व राज्य कृषि मूल्य अयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे बऱयाच वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. यावेळी शेतकऱय़ांना चांगले दिवस यावेत या करीता राज्यात तुमचे काही काम नाही, तुम्ही छडी घेवून दिल्लीतच रहा असा `राजकीय` सल्ला श्री. निलंगेकर यांनी श्री. पटेल यांना दिला. इतकेच नव्हे तर केंद्रीय कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष व्हा या करीता आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही दिली. त्यांचा हा सल्ला म्हणजे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणातून बाहेर पडा असे म्हणण्या सारखा आहे. त्यामुळे श्री. पटेल यांनी देखील त्यांना व्यासपीठावरून `जातो बाबा जातो` अशी आपल्या स्टाईलमध्ये दाद दिल्यानंतर उपस्थितांत मात्र हंशा पिकला.

राज्याचे कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे एकाच निलंगा तालुक्यातलेच आहेत. गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात आहेत. पण दोघाचे कधीच जमले नाही. एकमेकांच्या व्यासपीठावर ते नसतात. पक्षाच्या व्यासपीठावरही फारसे हे दोघे एकत्र दिसले नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत श्री. पटेल हे औसा मतदारसंघातून उभे होते. त्यावेळेस
श्री. निलंगेकर यांच्या समर्थकांनी मदत केली नाही असे आजही श्री. पटेल यांचे समर्थक सांगतात.

गेल्या दोन वर्षात पहिल्यांदा जिल्हा कृषि महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी (ता. २४) हे दोघे एका व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात श्री. पटेल यांचे पहिल्यांदा भाषण झाले. कृषि मूल्य अयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर दिल्लीत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतकऱयांच्या हिताचे काय काय निर्णय करून घेतले याचा पाडा त्यांनी वाचला. यातून त्यांनी आपले `दिल्ली दरबारात` वजन वाढल्याचे त्यांनी श्री. निलंगेकर यांना दाखवून दिले. त्यांचे हे वजन पाहूनच कृषि विभागाने या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले होते.

श्री. निलंगेकर यांनी आपल्य़ा भाषणाची सुरवातच श्री. पटेल यांच्यावरून केली. दिल्लीत बसणाऱय़ांना जमिनीची काही माहिती नाही. जमिनीवरची माहिती असणारा माणूस दिल्लीत असला पाहिजे. दिल्ली छडी घेवून बसणारा माणूस लागतो. तोही निलंगा तालुक्यानेच दिला आहे. तुम्ही केंद्रीय कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष व्हावेत या करीता आम्ही शिफारस करू. शेतकऱय़ाला न्याय देण्यासाठी तुम्ही दिल्लीतच रहा असा
सल्ला श्री. निलंगेकर यांनी दिला. त्यावेळी श्री. पटेल यांनी व्यासपीठावरूनच `जातो बाबा जातो` असे म्हणताच उपस्थितांत हंशा पिकला. आतापर्यंत झालेल्या निवडणुकात श्री. पटेल यांना दूरच ठेवण्यात आले आहे. श्री. निलंगेकर यांचा हा सल्ला म्हणजे पुढील निवडणूक सुद्धा दूर ठेवण्याचाच प्रकार आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Web Title: latur news politics sambhaji patil nilangekar and pasha patel