राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीची नौटंकी -  रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

लातूर - राज्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनीच आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांची केवळ नौटंकी सुरू आहे, अशी टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी (ता. 11) येथे पत्रकार परिषदेत केली. राज्यात आम्ही सत्तेत असलो तरी अधिकार काहीच नाहीत. केवळ आमची टेकूची भूमिका आहे. हा टेकू कधी काढायचा याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यात पंधरा वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार होते. त्यांनी शेतकरी विरोधी धोरणे राबविली. त्याचा परिणाम शेतकरी आत्महत्येत झाला. याच सरकारने शेतकऱ्यांवर वाईट वेळ आणली आहे. आता मात्र ते शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन करीत आहेत. त्यांना नैतिक अधिकारच राहिलेला नाही. त्यांची ही नौटंकी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना का भेटतात?, शासनावर टीका करायची आणि श्री. मोदी यांना बारामतीला का बोलावतात? ही आपल्या वडिलांची भूमिका समजून घेऊन त्यांनी टीका करावी, असे श्री. कदम म्हणाले. 

शिवसेनेच्या भूमिकेविषयी बोलताना श्री. कदम म्हणाले, ""शेतकरी सुखी झाला पाहिजे ही आमची पहिल्यापासूनची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर आलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी मंत्री गटाची समिती गठित केली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा वेळकाढूपणा आहे. शिवसेनेचा मंत्री या समितीत जाणार नाही. पूर्णपणे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. याकरिता शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. यात "मी कर्जमुक्त होणारच' असे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेतले जात आहेत. यातून शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळविल्या जाणार आहेत.'' 

"आम्ही सत्तेत आहोत; पण आम्हाला अधिकारच नाहीत. माझ्या पर्यावरण खात्याला बजेटच नाही. भाजपने फक्त आमचा बहुमतासाठी वापर करून घेतला आहे. आम्ही कधी बाजूला सरकतो याची राष्ट्रवादी कॉंग्रेस वाटच पाहत आहे. आम्ही बाजूला सरकलो तर राज्याला निवडणुकीचा खर्च परवडणारा नाही; पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. टेकू कधी काढायाचा याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, असे श्री. कदम म्हणाले. 

माजी आमदार दिनकर माने, जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक उपस्थित होते. 

Web Title: latur news ramdas kadam shiv sena congress ncp