सांगा, मी कोण आहे?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

लातूर - पणन, वखार, महसूल अधिकारी यांच्यात असलेला असमन्वय, खरेदी केंद्रावर तूर घेतल्यानंतर वखार महामंडळाकडून तूर नाकारण्याचे प्रकार, तुरीचे वजन न करणे, वाहनातून तूर खाली उतरवली जात नसल्याने त्रस्त झालेले शेतकरी हा सर्व प्रकार राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाहिला. त्यांनी पणन, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्यानंतर आमच्या "साहेबां'ना विचारतो, असे उत्तर अधिकाऱ्यांनी त्यांना दिले. त्यानंतर "सांगा...मी कोण आहे?,' असा संतप्त सवाल करण्याची वेळ खोत यांच्यावर आली!

सदाभाऊ खोत यांनी बुधवारी शासकीय तूर खरेदी केंद्राला भेट दिली. या केंद्रावर होत असलेले हाल शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडले. या केंद्रावर बाजार समितीचे सहकार्य असताना जिल्हा उपनिबंधक, पणन, महसूल, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांत कोणताही समन्वय नसल्याचे खोत यांना आढळले. त्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मंत्री भेट देत असताना वखार महामंडळाचा अधिकारी केंद्रावर नव्हता. त्यांची वाट पाहात खोत यांना अर्धा तास खरेदी केंद्रावर बसून राहावे लागले.

अधिकारी भेटल्यावर खोत यांनी फेडरेशनने तूर खरेदी केल्यानंतर पुन्हा तुम्ही तूर का नाकारता, खरेदी केंद्रावरच तुमचा तपासणी अधिकारी का बसवत नाही, एक गाडी खाली उतरावयाला 24 तास का लागतात, माणसे का वाढवत नाही, अशी प्रश्‍नांचा भडीमार केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एका महिला अधिकाऱ्याने तर "जीआर' नसल्याचे सांगितले.

त्यानंतर खोत यांनी "सांगा, मी कोण आहे? तुम्हाला "जीआर' कशाला हवा, मंत्र्यांनी सांगितलेले तुम्हाला कळत नाही का, असा समजवजा सवाल या अधिकाऱ्याला केला. तसेच पणन संचालकांशी मोबाईलवर बोलून येथील परिस्थितीची माहिती दिली. तसेच संबंधितांवर कारवाई करावी, असा आदेश दिला. बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा, सचिव मधुकर गुंजकर, जिल्हा उपनिबंधक बी. एल. वांगे आदी या वेळी उपस्थित होते.

गुन्हा दाखल करण्याचा आदेश
खोत यांनी तुरीच्या मोजमापाची पाहणी केली. चाळण करून खाली पडलेली तूर हमाल घेऊन जातात, अशी तक्रार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर हमालांनी काढून ठेवलेल्या तुरीच्या एका पोत्यावर जाऊन खोत बसले. "ही तूर कोणाची आहे, त्याला समोर घेऊन यावे,' असे त्यांनी सुनावले. पण एकही जण समोर आला नाही. त्यानंतर अशी हमाली घेतली जात असेल तर गुन्हा दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला.

Web Title: latur news sadabhau question to officer