लातूर जिल्ह्यातील एसटीची बससेवा पूर्ववत

विकास गाढवे 
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटीचे कर्मचारी सोमवारी (ता. 17)  मध्यरात्रीपासून संपावरगेले होते. ऐन दिवाळीत संप पुकारल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांना जादा प्रवास भाडे मोजून मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला.

लातूर : चार दिवसाच्या संपानंतर शनिवारी (ता. 21) सकाळी सहापासून जिल्ह्यातील एसटीची बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पाचही आगारातून रोजच्या वेळापत्रकानुसार बसगाड्या धावू लागल्याची माहिती एसटीचे विभाग नियंत्रक के. एस. लांडगे यांनी 'सकाळ'ला दिली.

सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटीचे कर्मचारी सोमवारी (ता. 17)  मध्यरात्रीपासून संपावरगेले होते. ऐन दिवाळीत संप पुकारल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांना जादा प्रवास भाडे मोजून मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला. दिवाळीच्या आनंदात प्रवासासाठी कसरत करावी लागली. आज ना उद्या संप मिटेल, या आशेवर प्रवाशी होते तर सरकार चांगला मार्ग काढील, अशी आशा एसटीच्या कर्मचाऱ्यांना होती. मात्र, काहीच मार्ग निघाला नाही. यामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एसटी कर्मचाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारून सर्वांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. तर पोलिसांनी चौथ्या दिवशी शुक्रवारी (ता. 20) प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस बसमधून निलंगा, उदगीर व अहमदपूर मार्गावर मोफत प्रवाशी सेवा सुरू केली.

पोलिसांच्या या उपक्रमामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपक्रमाचे कौतुक केले. संप मिटणार की नाही, अशी चर्चा होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटीचे कर्मचारी शनिवारी सकाळी कामावर रूजू झाले. यातूनच जिल्ह्यातील सर्व मार्गावरील एसटीची बससेवा पूर्ववत सुरू झाली.  सकाळी सहा वाजल्यापासूनच्या वेळापत्रकानुसार सर्व मार्गावरील बसगाड्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात संप काळात दुसऱ्या आगाराच्या थांबलेल्या बसही लवकरच मार्गस्थ होतील,  असे विभाग नियंत्रक के. एस. लांडगे यांनी सांगितले.

Web Title: Latur news st employee strike called off