मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याने उदगीरात दगडफेक; शहरात तणाव

udgir incident
udgir incident

उदगीर (लातूर): गेल्या आठ दिवसांपूर्वी मारहाण झालेल्या एका युवकाचा येथील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी प्रेत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर ठेवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. शहर पोलीस ठाण्यासमोर जमावाने दगडफेक केली.

या घटनेचे वृत्त शहरात कळतात अवघ्या अर्ध्या तासात शहर सामसूम झाले. अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तोंडार (ता.उदगीर)  येथील ऑटो पॉईंटवर चौकात बुधवारी (ता.१३) रात्री आठच्या सुमारास पैशाच्या देण्याघेण्याच्या वादातून मारहाण झाली होती.

आरोपी तानाजी फुले, राजकुमार बिरादार (दोघेही रा. हैबतपुर), महेश बिरादार, शांतवीर बिरादार (दोघेही रा. मलकापूर) यांनी संगनमत करून लोखंडी गज, काट्या व हॉकी स्टिकने फिर्यादीचा चुलत भाऊ बशी अहमद सय्यद (वय-३०) रा. हैबतपुर यास तू घेतलेले पैसे मला परत कर म्हणत शिवीगाळ करत याच आरोपीने मयताच्या डोक्यात अंगावर मांडीवर मारून गंभीर जखमी केले. जीवे मारण्याचा प्रयत्न केला या आशयाची फिर्याद चुलत भाऊ फिरोज निजामसाब सय्यद (रा.हैबतपुर) याने रविवारी दिल्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी (ता.१९) सकाळी उपचार घेत असताना या मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा मृतदेह नातेवाइकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर ठेवला. या आरोपीला अटक जोपर्यंत करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेतला. हळूहळू ही वार्ता शहरात पसरतात पोलीस ठाणे शहरच्या आवारात जमाव निर्माण झाला. शहर पोलीस ठाण्यासमोर या जमावाने दगडफेक सुरू केली यात काही मोटारसायकल, भेळच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बदलून जीवे मारला असल्याचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी या नातेवाईकांना दिले त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आला.

या घटनेचे वृत्त कळताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली चौबारा रोड हनुमान कथा मुक्कावर भाजी मार्केट परिसरात नगरपालिका शिवाजी चौक मोंढा रोड देगलूर रोड या भागातील अनेक व्यापाऱ्यांनी आपले दुकान तात्काळ बंद करून घरी जाणे पसंत केले. यादरम्यान तातडीने उदगीरात दाखल झालेले अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

दगडफेकीत तिघे जखमी-.
या दगडफेकीमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. कामानिमित्त औरंगाबाद येथून उदगीरला येत असलेले उद्धव पाटील हे शहरातील पोलिस ठाण्यात जवळ आले असता जमावाने त्यांच्या कारवर दगडफेक केली त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे.

देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिंगारे कर्तव्यावर हजर होत असताना त्यांच्या गाडीवरील जमावाने दगडफेक केली त्यात तेही जखमी झाले आहेत. नळेगाव रोडवर झालेल्या दगडफेकीत डॉ ताहेर यांच्या मातोश्री जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उदगीरात दाखल झाले असून जिल्हाभरातून आवश्यक असणारी पोलीस कुमक उदगीरला मागवण्यात आली आहे.

जमाव दोनशेचा अन पोलीस वीस-
शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मृतदेह आणून ठेवल्या नंतर हळू दोनशे ते अडीचशे चा जमाव तेथे जमला. या जमावाला हळूहळू पोलीस ठाण्याबाहेर करण्यात आले. पोलीस स्टेशन आवाराच्या बाहेर जातात या जमावाने पोलीस ठाण्याकडे दगडफेक करायला सुरुवात केली. यावेळी जवळपास दोनशेचा जमाव अन केवळ वीस पोलिस असल्याची स्थिती तेथे होती. संवेदनशील उदगीरची दंगलीची पार्श्वभूमी असतानाही येथे सातत्यानं संख्याबळ कमी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

चार दिवसाने उशिरा गुन्हा-
ही घटना घडल्यानंतर व मारहाण झालेला युवक गंभीर अवस्थेत दवाखान्यात असताना तब्बल चार दिवस कोणत्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हा गुन्हा का दाखल झाला नाही? अशी विचारणा या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांना करण्यात आली. ही घटना पोलीस विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com