साडेदहा लाख वृक्षांची लागवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

लातूर - पर्यावरण संतुलनासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या चार कोटी वृक्षलागवड मोहिमेला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळाला. एक ते सात जुलैदरम्यान राबवलेल्या मोहिमेत जिल्हा प्रशासनाने पाचव्याच दिवशी जिल्ह्याला दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ओलांडले होते. यात मोहिमेच्या शेवटच्या दिवसापर्यंत (ता. सात) प्रशासनाने दहा लाख ४३ हजार वृक्षांची लागवड करून १३४ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

मागील वर्षी राबवण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवड मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर सरकारने चार कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली. यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरणासह विविध सरकारी यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार यंत्रणांनी खड्डे खोदून मोहिमेची जय्यत तयारी केली होती. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व विभागीय वन अधिकारी आर. ए. सातेलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व सामाजिक वनीकरणाने वृक्ष लागवडीसाठी रोपांची उपलब्धता केली. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते मोहिमेला सुरवात केल्यानंतर मोहिमेला जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व स्वयंसेवी संस्थांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली. यातूनच मोहिमेच्या पाचव्याच दिवशी जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ओलांडले. जिल्ह्याला सात लाख ७६ हजाराचे उद्दिष्ट असताना पाचव्या दिवशीच आठ लाख ३८ हजार ४५२ वृक्षांची लागवड करून मोहिमेत उद्दिष्टाच्या पुढे लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक आर. जी. मुदमवार यांनी दिली. पहिल्या दिवशीच तीन लाख ५८ हजार ६४२ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. सर्व यंत्रणांचा प्रतिसादामुळेच उद्दिष्टाच्या १३४ टक्के वृक्ष लागवड करणे शक्‍य झाल्याचे श्री. मुदमवार यांनी सांगितले.

Web Title: latur news tree plantation environment