तूर यंदाही पिकविणार; संकटाचे ढग दुरावणार?

हरी तुगावकर
मंगळवार, 6 जून 2017

मराठवाड्यात खरीपाऱीपाची 49 लाख हेक्‍टरवर पेरणीची शक्‍यता

मराठवाड्यात खरीपाऱीपाची 49 लाख हेक्‍टरवर पेरणीची शक्‍यता
लातूर - मराठवाड्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. बाजारपेठेत भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले. शासनाच्या खरेदी केंद्रावर हमी भावाप्रमाणे तूर विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. लवकरच सुरू होणाऱ्या खरीप हंगामातही तुरीचे क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा वाढण्याची शक्‍यता आहे. खरिपातील तूर बाजारात येईपर्यंतच शासनाने खरेदी केलेल्या तुरीचा लिलाव होऊन तीही बाजारात येणार आहे. याचा परिणाम भाव कोसळण्यावर होऊ नये, तूर उत्पादक पुन्हा अडचणीत येऊ नयेत, याची खबरदारी आतापासून घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

मराठवाड्यात तूर उत्पादनाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी तुरीचे उत्पादन घेतात. नगदी पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. मराठवाड्यात तुरीचे सरासरी पेरणी क्षेत्र पाच लाख 21 हजार हेक्‍टर आहे. 2016 मध्ये पाच लाख 95 हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. पाऊस चांगला झाल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणात आले. राज्यातही अशीच परिस्थिती होती. तुरीचा हमी भाव पाच हजार पन्नास रुपये असताना बाजारपेठेत मात्र चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलला राहिला. त्यामुळे शासनाला खरेदी केंद्रे सुरु करावी लागली. त्यांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली. दहा जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवण्याचे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. यात 50 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शासनाने खरेदी केली आहे.

शासन तुरीचा लिलाव करते. ती पुन्हा बाजारातच येते. याला आणखी काही महिने लागणार आहेत. तोपर्यंत नव्या खरिपातील तूर बाजारात येते. त्यात 2017 च्या खरीप हंगामात कृषी विभागाने मराठवाड्यात साडेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची पेरणी प्रस्तावित केली आहे. पाऊस चांगला झाला तर उत्पादन चांगले होणार आहे. त्यामुळे शासनाची लिलावातील तूर व नव्या खरिपातील तूर एकदाच बाजारात आली तर भावाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर तूर उत्पादनाचा अंदाज बांधल्यावर लगेचच खरेदीचे सुयोग्य नियोजन करावे लागेल.

दरम्यान, विविध पिकांसाठी मराठवाड्यात खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र 49 लाख 11 हजार हेक्‍टरचे आहे. 2016 मध्ये 49 लाख तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. या वर्षी 49 लाख 14 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. पेरणीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे.

पीकनिहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र (आकडे लाख हेक्‍टरमध्ये)
पिके------सरासरी क्षेत्र--------2016 मध्ये पेरणी झालेले क्षेत्र---2017 मध्ये प्रस्तावित क्षेत्र

मका--------2.54----------------3.03-------------------------3.14
ज्वारी-------4.18-----------------1.80-------------------------2.13
बाजरी-------2.35----------------1.71-------------------------1.82
भात---------0.27----------------0.08-------------------------0.09
तूर----------5.21------------------5.95-----------------------5.50
मूग---------1.62--------------------2.11-----------------------2.53
उडीद--------1.67-------------------1.68-----------------------2.00
सोयाबीन------10.39---------------17.66-----------------------16.12
कापूस----------17.17--------------14.45----------------------13.74
ऊस------------2.39--------------0.01------------------------1.45
इतर पिके--------1.32----------------0.55-----------------0.62
----------------------------------------------------------------------------
एकूण--------49.11----------------49.03------------------49.14

Web Title: latur news tur production