ओव्हरब्रिज नसल्याने प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

उदगीर - येथील रेल्वे स्थानकामध्ये एकावरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशांना कसलीच सोय नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. येथून मुंबई, बेंगळुरू, तिरुपती या भागासाठी रेल्वे सुरू केल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. मागील काही महिन्यांपासून या स्थानकावर दिवसभर गर्दी दिसून येत आहे.

उदगीर - येथील रेल्वे स्थानकामध्ये एकावरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशांना कसलीच सोय नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. येथून मुंबई, बेंगळुरू, तिरुपती या भागासाठी रेल्वे सुरू केल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. मागील काही महिन्यांपासून या स्थानकावर दिवसभर गर्दी दिसून येत आहे.

प्रवाशांना कमी तिकिटात आरामात जाता येत असल्यामुळे प्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. हैद्राबाद, पुणे, मुंबई आणि बंगळुरूपर्यंत थेट सुविधा उपलब्ध झाल्याने व्यापारी वर्गाची सोय झाली आहे. यामुळे अनेक व्यापारी आपापला माल या रेल्वेमार्गेच आणणे पसंद करीत आहेत. अनेकवेळेला उदगीर रेल्वे स्थानकावर परळी आणि बिदरहून येणारी रेल्वे अथवा मालगाडी एकाच कालावधीमध्ये या मार्गावर आमने-सामने येत आहेत. अशावेळी उदगीर स्थानकावर प्रथम आलेली गाडी थांबते आणि उशिरा आलेली रेल्वे ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर थांबते. याबाबत रेल्वे स्थानकांवर घोषणा केली जाते; परंतु प्रवांशाना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दादराच नाही. त्यामुळे प्रवाशांचा प्लॅटर्फार्म ओलांडण्याचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.

दिव्यांगाना तर हा प्रकार म्हणजे अत्यंत जीवघेणा ठरू शकतो. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी येथे कसलीच सोय नाही. यामुळे प्रवांशाना आपापल्या सामानांसह अंदाजे पाच ते सहा फूट खाली रूळावर उतरून दुसऱ्या बाजूला पुन्हा या सामानासह चढावे लागत आहे. या धोकादायक प्रकारापासून तातडीने मुक्ती मिळावी आणि एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरीत आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांचे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले आहे. या ठिकाणी फुट ओव्हर ब्रिजसाठी तात्त्विक मान्यतासुद्धा नुकतीच मिळाली आहे. या फुट ओव्हर ब्रिजमुळे प्रवांशांसोबतच या भागातील विद्यार्थ्यांचीही सोय होणार आहे; परंतु निविदा वगैरे निघून प्रत्यक्ष कामासाठी चार ते पाच महिने लागतील आणि चालू वर्षअखेरीपर्यंत ब्रिजचे काम पूर्ण होईल.
- मोतीलाल डोईजोडे, सल्लागार सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड तथा अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती, उदगीर

Web Title: latur news udgir railway bridge udgir railway station