हिरव्या शिवारात सुकली मने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

भादा - चालू खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी ही शेतकऱ्यांसाठी नगदी समजली जाणारी पिके पावसाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस बेभरवशाची वाटत असून फूल आणि फळ लागण्याच्या मोसमातच पावसाने जवळपास तीन आठवड्यांचा विसावा घेतल्याने या पिकांचे उतपन्न शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पावसाच्या या लहरीपणात गावोगावचा शिवार जरी हिरवा दिसत असला, तरी अनेक शेतकऱ्यांची मने मात्र सुकलेली जाणवत आहेत. 

भादा व परिसरात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यानंतर या भागातील अनेक शेतकऱ्यांनी मूग, सोयाबीन, उडीद, या पिकांची पेरणी केलेली आहे. तर कपाशीसारख्या नगदी पिकाची लागवडही या भागात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कापसाला तर शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हटलं जातं; मात्र भरमसाट लागवड खर्च, दोन-दोनदा खुरपणी अन महागडी औषध फवारणी या पांढऱ्या सोन्याला करून थकलेले शेतकरी आता पावसाची वाट बघता बघताच थकले आहेत. तर माळरानचे सोयाबीनही वरचेवर माना टाकत आहेत. येत्या काही दिवसांत पावसाने उघाड दिलीच तर मूग आणी उडिदाचे उत्पादन शेतकऱ्यांना धोका देऊ शकते. खरीप हंगामातील या पिकांबरोबरच या पावसाच्या लहरीपणाचा उसावरही मोठा परिणाम होत असून उसाची वाढ पावसाअभावी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. एवढेच नव्हे, तर पावसाच्या या विसाव्याने ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत; तसेच शेतकऱ्यांकडेच कामे कमी असल्याने शेतमजुरांनाही याची आर्थिक झळ बसत आहे.

Web Title: latur news weather marathwada agriculture