चिरेबंदी विहिरी मोजण्याइतक्‍याच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

भादा - बदलत्या काळानुसार शेतातील तंत्रज्ञानही आमूलाग्र बदलत आहे. जुन्या काळातील चिरेबंदी विहिरी आता नव्या पिढीसाठी इतिहासच बनल्या आहेत. भाद्यात तर अशा जुन्या काळातील बांधलेल्या चिरेबंदी विहिरी बोटावर मोजण्याइतक्‍याच राहिल्या आहेत.

भादा - बदलत्या काळानुसार शेतातील तंत्रज्ञानही आमूलाग्र बदलत आहे. जुन्या काळातील चिरेबंदी विहिरी आता नव्या पिढीसाठी इतिहासच बनल्या आहेत. भाद्यात तर अशा जुन्या काळातील बांधलेल्या चिरेबंदी विहिरी बोटावर मोजण्याइतक्‍याच राहिल्या आहेत.

तीन पिढ्यांपूर्वी  बांधलेल्या काही साचेबद्ध विहिरी आजही भाद्यात चांगल्या पद्धतीने  सिंचनासाठी वापरात आहेत. या विहिरींच्या तुलनेत अगदी अलीकडच्या काळात काही वर्षांपूर्वीच  बांधण्यात आलेल्या छोट्या-छोट्या बंधाऱ्यांची खिळखिळी अवस्था झालेली आहे. दहा दशकांपूर्वी इंजिनिअरच्या मार्गदर्शनाशिवाय बांधल्या गेलेल्या या विहिरी आजही या भागात भक्कम उभ्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक विहिरींचे तीन पिढ्यापूर्वीचे बांधकाम असूनदेखील या विहिरी सप्टेंबर १९९३ च्या भूकंपात व नंतरही अस्तित्व टिकवून आहेत हे विशेष.  या वरून त्या काळातही  विहिरींची बांधकाम कला व  गवंडी किती पक्के होते हे लक्षात येते. खरे तर या विहिरी जुन्या बांधकामाचा उत्कृष्ट नमुनाच आहेत.

काही विहिरी तर अगदी जुन्या काळातीलच आहेत. या विहिरीवर भाद्यात थोडाथोडा ऊस असायचा. त्या काळी उसाला सिंचनासाठी वापरात आणल्या गेलेल्या मोटांसाठी बांधलेल्या ‘वढवणीच्या‘ खुणा आजही काही विहिरींवर आहेत. शेतीत विद्युत पुरवठ्याची ज्या वेळेस सोय नव्हती त्या वेळेस या विहिरीची चर्चा आसपासच्या गावात असायची. या विहिरीवर चार बैल आणि दोन माणसे पहाटे तीन ते चारपासूनच मोट हाकलण्यासाठी राबायचे. ठिबकच्या आजच्या काळात या विहिरी आपले साथीदार माणसे व बैलांच्या वैभवाला पोरकी झालेली दिसतात. 

आता मात्र भूकंपानंतर सहसा बुडातून चिरेबंदी विहिरी बांधताना कोणी दिसत नाही. त्या जागी आता काँक्रिटचे बांधकाम आले असून  चिरेबंदी विहिरीसारखा आजच्या काही गवंड्यांना कंकणासारखा विहीर बांधकामाचा गोलाकार साकारता येत नाही हे विशेष. अनेक शेतकऱ्यांचा कल विंधन विहिरी घेण्याकडे वाढला; पण जवळपास आठशे फूट खोल खोदूनही काही बोअरमधून बऱ्याच शेतकऱ्यांच्या ‘हातात’ धुराळाच येताना दिसतो.

Web Title: latur news well