esakal | Latur: आता जगायचं कसं? पुराने शेतकऱ्यांची स्वप्नेच गेली वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

पुराच्या पाण्यामुळे खरिप पीके वाहून गेली

निलंगा : आता जगायचं कसं? पुराने शेतकऱ्यांची स्वप्नेच गेली वाहून

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा : 'काय करावं.. साहेब मला आडीच एकर रान हाय.. सोयाबीन चांगलं आलं व्हतं..पुराच्या पाण्यात..समधं गेलं..मागच्या साली..बी..असंच झालं..आता जगावं तर कसं... पीक तर गेलचं पर...रब्बी पेरायला आता.. माती ..बी.. शिल्लक नाय...ही व्यथा होती.. गौर ता. निलंगा येथील शिवाजी भोजणे व भागवत सावंत या शेतकऱ्यांची...

सतत झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे मांजरा व तेरणा नदीला प्रचंड पूर आला होता यामुळे नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मांजरा प्रकल्पातून पाणी सोडल्याने नदीपात्राच्या बाहेर पाणी पडले नदीला मोठा पूर आला. यामुळे निलंगा तालुक्यातील गौर, शेंद, मुगाव, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ, गिरकचाळ, वळसांगवी, चिचोंडी, हंचनाळ, नदीवाडी, हलसी-तुगाव, शिऊर या गावाना मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मुग पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे. तर ऊस पीक आडवे पडून मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्याने पीक कर्ज

गौर ता. निलंगा येथील भागवत सावंत व शिवाजी भोजने यांना एक- एक हेक्टर जमीन आहे. नदीकाठी पेरणी केलेले संपूर्ण सोयाबीन वाहून गेले असून आता रब्बी पेरणीसाठी मातीही शिल्लक नाही. पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने आता जगावं तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच आवस्था मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांची जवझाली असून आता पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पूर ओसरला आहे. पीके चार पाच दिवस पाण्यात असल्याने नासाडी झाली असून असलेल्या शेगांला कोंबारे फुटू लागले आहेत.

तेरणा नदीलाही पूर आल्याने यलमवाडी, लिंबाळा, येळणूर, गुंजरगा, सावरी, मानेजवळगा, तगरखेडा, कोकळगाव, धानोरा, औरादशहाजानी, भंगार-चिंचोली, सोनखेड, बामणी, सांगवी-जेवरी, नदीहत्तरगा, पिंपळवाडी यासह अनेक गावांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये नगदी पैसा निर्माण करणारा खरिप हंगाम असतो या हंगामाच्या भरोशावर शेतकरी आपल्या संसारात नियोजन करतात मात्र अशा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांनी उराशी बाळगवलेल्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. शासनाने पंचनामे करण्यासाठी वेळ न दवडता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी व रब्बी हंगामासाठी तत्काळ पॕकेज घोषित करावी अशी मागणी नदीकाठच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. तरच शेतकऱ्यांना या संकटातून उभारी मिळणार आहे.

हेही वाचा: जम्मू -काश्मीर :शोपियानमध्ये चकमक; 1 दहशतवाद्याचा खात्मा

एक हजारापेक्षा अधिक शेतीचे नुकसान

मांजरा व तेरणा नदीकाठच्या पूरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार जवळपास एक हजारापेक्षा अधिक हेक्टरचे नुकसान झाले असल्याचे माहीती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली. शिवाय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांना आदेश देण्यात आले असून किती नुकसान झाले हे पंचनामे करून अहवाल दाखल केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top