ऑईल मिलच्या ड्रेनेज टॅंकमध्ये नऊ कामगार गुदमरल्याची भीती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

लातूर - येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कीर्ती ऑईल मिलमध्ये ड्रेनेजच्या टॅंकची सफाई करताना सोमवारी (ता. 30) दुपारी चारच्या सुमारास गुदमरून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तथापि, रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच होते. 

लातूर - येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कीर्ती ऑईल मिलमध्ये ड्रेनेजच्या टॅंकची सफाई करताना सोमवारी (ता. 30) दुपारी चारच्या सुमारास गुदमरून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तथापि, रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच होते. 

येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये शेकडो एकरांवर कीर्ती ऑईल मिल आहे. या मिलमध्ये सुमारे एक हजार कामगार असून, एका पाळीमध्ये तीनशे ते चारशे कामगार काम करतात. सोयाबीनवर प्रक्रिया करून तेलनिर्मिती करणाऱ्या या मिलच्या ड्रेनेज टॅंकच्या सफाईचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना सोमवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान टॅंकमध्ये उतरलेले व त्यांना काढण्यासाठी गेलेले असे नऊ कामगार गुदमरून मृत्यू पावल्याची शक्‍यता आहे. ड्रेनेज टॅंक फोडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. 
ड्रेनेज टॅंकमधून सतत विषारी वायू बाहेर येत असल्याने रात्री उशिरापर्यंत शोधकार्यात अडचण येत होती. रात्री साडेनऊच्या सुमारास टॅंकच्या एका बाजूच्या भागाला छिद्र पाडून टॅंकमधील पाणी सोडून देण्यात आले. त्यानंतर टॅंकची भिंत फोडण्याचे काम करण्यात येत होते. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड व इतर पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख, आमदार ऍड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, महापौर दीपक सूळ, व्यंकट बेद्रे, रमेश कराड आदींनी घटनास्थळी भेट दिली. श्री. देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी रोकडे, तहसीलदार संजय वारकड यांच्याशी घटनेसंदर्भात चर्चा करून त्यांना सूचना दिल्या. 

घटनास्थळी नातेवाइकांचा आक्रोश 
या मिलमध्ये परिसरातील हरंगूळ, नागझरी, पाखरसांगवी व इतर गावांतील कामगार काम करतात. त्यामुळे घटनेची माहिती कळताच कामगारांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मिलकडे धाव घेतली. शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या दुर्दैवी घटनेमुळे कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी आक्रोश करीत होते. कीर्ती ऑईल मिलमध्ये व जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती निवारणासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले. 

""कीर्ती ऑईल मिलमध्ये जी घटना घडली त्यातील आपद्‌ग्रस्तांच्या नातेवाइकांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करू. कामगारांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू आणि कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. सुरक्षा मानकांची तपासणी करून तातडीने ही मिल बंद करण्याच्या पर्यायाचा विचार करू.'' 
- पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर 

Web Title: latur oil mill