स्वच्छ शाळा पुरस्कारातही लातूर पॅटर्न

latur
latur

लातूर : विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रूजवण्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा पुरस्कारात जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी हा पुरस्कार पटकावला असून शाळांना प्रत्येकी पन्नास हजार रूपये पुरस्कार जाहिर झाला आहे.

पुरस्कार मिळवलेल्या देशातील 52 शाळांत या शाळांचा समावेश असून पुरस्कारांत अव्वल ठरलेल्या जिल्ह्यांत लातूरचा देशात तिसरा क्रमांक आला आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रांत या शाळांसोबत जिल्हा प्रशासनाचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांत सामुहिक व वैयक्तिक स्वच्छतेची जागृती करण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2014 पासून स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियान हाती घेतले आहे. या अभियानात शाळांनी राबवलेले स्वच्छतेचे उपक्रम आणि विद्यार्थ्यांत केलेल्या जागृतीची स्वतंत्र पथकामार्फत तपासणी करून पुरस्कारासाठी निवड केली जाते.

सन 2017 - 2018 वर्षातील पुरस्कारासाठी देशभरातील अनेक हजारो शाळांनी सहभाग घेतला होता. यात राज्यातील एक लाख आठ हजार 145 शाळांपैकी 27 हजार 179 शाळांनी नोंदणी करून वीस हजार 602 शाळांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. स्पर्धेत देशभरातील 729 शाळा पात्र ठरल्या तर तपासणीनंतर 52 शाळांची पारितोषिकासाठी निवड झाली. स्पर्धेत देशात अव्वल आलेल्या नऊ जिल्ह्यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यात लातूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शंभर गुणांची स्पर्धा
पुरस्कारासाठी शंभर गुणांची स्पर्धा होती. यात शुद्ध पाण्यासाठी 22, स्वच्छतागृहाचा नियमित वापराला 28, हात धुण्याच्या सवयीला 20, स्वच्छतेच्या सुविधांच्या देखभाल दुरूस्तीला पंधरा तर विद्यार्थ्यांत झालेला स्वच्छतेबाबतचा वर्तन बदल आणि क्षमतेला पंधरा गुण आहेत. यात बावची शाळेला 93.6 तर जाऊ शाळेला 92.6 गुण मिळाले. दोन्ही शाळांनी विद्यार्थ्यांवर चित्रकला, निबंध आदी स्पर्धांतून स्वच्छतेचे संस्कार रूजवले. शोषखड्ड्यातून सांडपाणी जमिनीत मुरवले. कचऱ्याचे वर्गीकरण करून कंपोष्ट खत निर्मितीतून घनकचरा व्यवस्थापन केले. वृक्ष लागवड करून शाळांचा परिसर निसर्गरम्य केला. जाऊ शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. मुखम व बावचीचे जे. के. जमादार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी योगदान दिले.   

शासकीय निवासी शाळांनी जनजागृतीचे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले. यामुळे विद्यार्थ्यांत स्वच्छतेबाबतीत दृश्य बदल झाले. आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या जडलेल्या सवयी आयुष्यभर कामी येतील. त्यांचे जीवनमान उंचावेल. स्पर्धेत लातूरच्या दोन तर गोटेवाडी (जि. हिंगोली) येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेला पुरस्कार जाहिर झाला आहे. तीनही शाळा सामाजिक न्याय विभागाच्या लातूर विभागातील आहेत. पुरस्कारासाठी शाळा व विभागातील सर्व घटकांचे मोठे योगदान आहे. 
- दिलीप राठोड, प्रादेशिक उपायुक्त, लातूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com