पाण्याचे कर्ज फेडून लातूरकरांनी कलंक पुसला

विकास गाढवे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

लातुरातून पाणी बचतीची सुरवात
पाण्यासाठी राष्ट्रीय जलपारितोषिक मिळालेल्या लातुरात पाण्याचा मोठा अपव्यय होतो आहे. हा अपव्यय टाळून पाणी बचत करण्याची लातूरकरांची तीव्र इच्छा असून महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासाठी पाठवलेल्या सूचनांत नागरिकांनी यासाठी आग्रह धरला आहे. नळाला मीटर बसवून पाणी बचतीचे प्रयत्न तडीस जात नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीय जलपारितोषिकाच्या निमित्ताने पाणी बचतीच्या या प्रयत्नांना आता खीळ घालून जमणार नाही. पाणी बचतीची सुरवात लातूरपासून करूयात, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.

लातूर : चार वर्षापूर्वी लातूरला रेल्वेने पाणी आणले. यामुळे लातूरला लागलेला दुष्काळाचा कलंक सामुहिक प्रयत्नांतून पुसत रेल्वेने आणलेल्या पाण्याचे कर्ज लातूरकरांनी फेडले आहे. जिल्ह्याला मिळालेल्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जलपारितोषिकाच्या निमित्ताने यावर शिक्कामोर्तब झाले. पारितोषिकामुळे लातूरकरांची जबाबदारी वाढली असून ती लातूरकर निश्चितच पेलून दाखवतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या जल, संसाधन व नदी विकास मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्याला मिळालेल्या यांना नदी व जलसंधारण श्रेणीतील प्रथम राष्ट्रीय जलपारितोषिकाच्या निमित्ताने ते `सकाळ`शी बोलत होते. श्रीकांत म्हणाले, की दुष्काळाच्या काळात लातूरला रेल्वेने पाणी आले. ही गोष्ट लातूरकरांसाठी भुषणावह नव्हती. रेल्वेच्या पाण्यामुळे लातूरला दुष्काळाचा कलंक लागला. हा कलंक पुसण्याचे काम केवळ प्रशासनाचे नव्हते तर सर्व घटकांनी त्यासाठी पुढे येण्याची गरज होती. यातूनच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी जलसंधारणाच्या कामात योगदान दिले. यामुळेच नदी व नाला खोलीकरणाकरणासह जिल्ह्यात जलसंधारणाची मोठी कामे झाली. यामुळेच यावर्षी कमी पाऊस होऊनही जिल्ह्यात टंचाईची तीव्रता जाणवत नाही. प्रशासनाला अजून एकही टॅंकर लावण्याची गरज पडलेली नाही. हे केवळ जागरूक लातूरकरांनी केलेल्या कामांमुळे घडले. पाण्याचे कर्ज फेडण्यात लातूरकर यशस्वी झाले आहेत. यामुळेच एकेकाळी रेल्वेने पाणी आणलेल्या लातूर जिल्ह्याला केंद्र सरकारनेच राष्ट्रीय जलपारितोषिक जाहिर केले आहे. पाण्याच्या (जल) नावाने असलेल्या या पुरस्कारामुळे लातूरचा दुष्काळाचा कलंक पुसला गेला आहे.``   

या पारितोषिकामुळे लातूरकरांची जबाबदारी वाढली असून आता पुन्हा जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लागणार नाही, यासाठी सर्वांना जागरूक रहावे लागणार आहे. पाण्याची ही परिस्थिती पिढ्यान पिढ्या कायम ठेऊन पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी नियोजन करण्याची हिच योग्य वेळ आहे. यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासोबत पाणी बचतीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासोबत जलसंधारणाचे लोकसहभागातून केलेल्या कामांची सातत्याने देखभाल व दुरूस्ती करून त्यांची पाणीसाठवण क्षमता कायम ठेवावी लागेल. काळाची गरज ओळखून पिक पद्धतीतही बदल करावा लागेल. लोकसहभागातून केलेल्या कामे आता लोकसहभागातूनच टिकवावी लागतील. त्यासाठी पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्वांना योगदान द्यावे लागेल. यासाठी प्रत्येक गावात लोकांच्या पुढाकारांतून स्वतंत्र व्यवस्था उभी केली जाणार आहे. राष्ट्रीय जलपारितोषिकाच्या निमित्ताने लातूरकर यापुढील काळात पाण्यासाठी कोणावर अवलंबून न रहाता पाण्याच्या स्वयंपूर्णतेसाठी निश्चितच वाटचाल करतील व त्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी व्यक्त केला.

आता छातीठोकपणे सांगता येणार
रेल्वेच्या पाण्यामुळे कोठेही लातूरचे नाव काढले की दुष्काळ व पाण्याची चर्चा होऊ लागली. तीन वर्ष होऊनही लोक विसरले नाहीत. यंदाच्या दुष्काळस्थितीत पुन्हा रेल्वेने पाणी येणार का, असे लोक विचारत आहेत. राष्ट्रीय जलपारितोषिकामुळे लातूरकरांना पूर्वीचे हे चित्र आम्ही बदलल्याचे छातीठोकपणे सांगता येणार असून बदललेल्या परिस्थितीचा स्वाभीमानही बाळगता येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. एकुणच पारितोषिकामुळे रेल्वेच्या पाण्याचे लातूर ही लातूरची ओळख आता संपुष्टात आल्याचे ते म्हणाले.   

लातुरातून पाणी बचतीची सुरवात
पाण्यासाठी राष्ट्रीय जलपारितोषिक मिळालेल्या लातुरात पाण्याचा मोठा अपव्यय होतो आहे. हा अपव्यय टाळून पाणी बचत करण्याची लातूरकरांची तीव्र इच्छा असून महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासाठी पाठवलेल्या सूचनांत नागरिकांनी यासाठी आग्रह धरला आहे. नळाला मीटर बसवून पाणी बचतीचे प्रयत्न तडीस जात नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीय जलपारितोषिकाच्या निमित्ताने पाणी बचतीच्या या प्रयत्नांना आता खीळ घालून जमणार नाही. पाणी बचतीची सुरवात लातूरपासून करूयात, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.

Web Title: latur people clear water loan for drought situation