जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ राष्ट्रवादीच्या वाटेवर; कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेत चाचपणी सुरू

ncp
ncp

निलंगा (लातूर): जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते पंडीतराव धुमाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग निलंगा तालुक्यात फार पुर्वीपासून आहे.

शरद पवार काँग्रेसमध्ये असतानाही या भागातील जेष्ठ कार्यकर्ते अॕड. हरीभजन पौळ, हाणमंतराव पाटील शिरोळकर, राजपाल शिंदे, सुधीर मसलगे, शहराध्यक्ष धम्मानंद काळे, अंगद जाधव, हसन चाऊस, लक्ष्मण कांबळे, गणी खडके यासह आदीनी पक्षाच्या कामाला सुरुवात करत पक्षाचा विचार सोडला नाही. तो तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे काम करीत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा लिंबनमहाराज रेशमे यांच्यावर आल्यानंतर त्यांनी पक्षाचे मोठे जाळे तालुक्यात निर्माण केले होते.

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने श्री. रेशमे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली. २०१४ ची विधानसभा लढवलेले बस्वराज पाटील नागराळकर निवडणुकीच्या नंतर पुन्हा तालुक्यात फिरकलेही नाही. पक्षावर पकड असलेला नेताच पक्षात राहिला नसल्याने घड्याळाची टिकटिक मंदावली आहे. तालुक्यात सुधीर मसलगे यांना तालुकाध्यक्ष पदावरून दूर करत दिलीप पाटील यांची नेमणूक केल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत.

शरद पवार विचार मंचाची शाखा स्थापन होऊन अर्ध्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली. दिलीप पाटील यांना पक्षातील कार्यकर्त्यांनी बळ न दिल्याने तेही औसा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ६८ गावांत रमलेले दिसत आहेत. महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची असल्याने महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस झपाट्याने वाढत आहे. लातूर जिल्ह्यात संजय बनसोडे यांच्या रुपाने एक मंत्री व जिल्हाध्यक्ष असलेले बाबासाहेब पाटील आमदार असल्याने पक्षाची ताकद जिल्ह्यात दिसत असतानाही निलंग्यात मात्र सत्तेचा कोणताच फरक पडलेला दिसून येत नाही.

निलंग्यात आगोदरच दोन गट निर्माण झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक निलंगा नगरपालिकेत आहे. नगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून गटबाजी थांबवून वरिष्ठ पातळीवरून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी कधी संपणार असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पंडीतराव धुमाळ यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. यामुळे पक्षाची अंतर्गत गटबाजी थांबून गावागावात पक्ष वाढीसाठी प्रयत्न होणार का याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com