लातूर रेल्वेस्थानकाला आले छावणीचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

लातूर - मुंबई-लातूर ही रेल्वे बिदरपर्यंत पळविण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाला लातूरकरांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. रद्द करा, रद्द करा रेल्वेचे विस्तारीकरण रद्द करा, अशा घोषणा देत लातूर-मुंबई रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने बुधवारी (ता. २६) रेल्वेचे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे यांना देण्यात आले आहे. दरम्यान, लातूरकरांचा विरोध लक्षात घेता रेल्वेस्टेशनला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

अनेक वर्षे आंदोलन केल्यानंतर लातूरकरांना दहा वर्षांपूर्वी लातूर-मुंबई रेल्वे मिळाली. नफ्यात असणारी ही रेल्वे आहे. दररोज तीनशे ते चारशे प्रवासी वेटिंगवर आहेत. क्षमतेपेक्षा दीड पट अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. असे असतानाही रेल्वे बिदरला पळविण्यात आली आहे. त्यामुळे लातूरकरांत संतापाची लाट उसळली आहे. यातून लातूर-मुंबई रेल्वे बचाव कृती समिती स्थापन झाली आहे. या समित्यांच्या वतीने आता टप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे. यात सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवारी येथे आले होते. या समितीच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. त्यांच्यासमोर रद्द करा, रद्द करा रेल्वेचे विस्तारीकरण रद्द करा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. त्यानंतर त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही लातूरकर विरोध करीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. रेल्वेने बिदर-कुर्ला व नांदेड-कुर्ला या रेल्वे नियमित सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली. लातूरकरांच्या भावना रेल्वे मंडळाला कळविल्या जातील अशी ग्वाही श्री. दुबे यांनी दिली. 

काही वर्षांपूर्वी ही रेल्वे नांदेडला पळविण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी लातूरकरांनी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर तो निर्णय रद्द झाला होता. त्यामुळे आज तसेच आंदोलन होईल या भीतीने स्थानिक व रेल्वेचे पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शनिवारी धरणे आंदोलन
लातूर-मुंबई रेल्वे बचाव कृती समितीची एक बैठक बुधवारी सायंकाळी येथे झाली. यात रेल्वे मंडळाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यात पुढील आंदोलन म्हणून ता. २९ एप्रिल रोजी सकाळी गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सर्व लातूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Latur railway station