सहा महिन्यांत दोनशे वाहन परवाने निलंबित

सुशांत सांगवे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या, वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभी करणाऱ्या, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बारकाईने लक्ष ठेवत आहे. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांत लातूर जिल्ह्यातील तब्बल 199 वाहनचालकांचे वाहन परवाने आरटीओने निलंबित केले आहेत. 

लातूर : वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या, वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभी करणाऱ्या, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बारकाईने लक्ष ठेवत आहे. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांत लातूर जिल्ह्यातील तब्बल 199 वाहनचालकांचे वाहन परवाने आरटीओने निलंबित केले आहेत. 

शहरात गेल्या काही महिन्यांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईला सुरवात झाली आहे.

 

गेल्या सहा महिन्यांत 199 वाहन परवाने वेगवेगळ्या कालावधींसाठी आरटीओने निलंबित केले आहेत. यात नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकीस्वारांबरोबरच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील म्हणाले, शहरात आणि जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांच्या घटनांचे विश्‍लेषण करण्यासाठी आमची दर महिन्याला बैठक होते. या बैठकीत अपघातामध्ये दुचाकीस्वारांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करीत दुचाकी चालवावी.

 

हेल्मेट घालावे. ओव्हरटेक करताना काळजीपूर्वक पुढे जावे. आवश्‍यक कागदपत्रे जवळ बाळगावीत. हॉर्न वाजवत नागमोडी आकाराने दुचाकी चालवू नये. याबाबत पालकांनीसुद्धा आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. वाहने चालविताना प्रत्येकानेच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा वाहन परवाने निलंबित केले जातील. 

अपघाताच्या ठिकाणी विशेष मोहीम 
शहरात आणि जिल्ह्यात ज्या भागात वारंवार अपघात होतात, त्या ठिकाणी आम्ही विशेष मोहीम राबविणार आहोत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर या भागात कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी योग्य ती दक्षता घेऊन वाहने चालवावीत, असेही पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur RTO suspended two hundred licences