लातूरची सुरक्षा लवकरच इनकॅमेरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

शहरात २५ ठिकाणी कॅमेरे; कॅमेऱ्यांसाठी वायफायचा वापर; आज चाचणी

लातूर - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेले लातूर शहरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे आता लवकरच बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शहरातील सुरक्षिततेसाठी २५ ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. शहराच्या दृष्टीने महापालिकेचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. यात गुरुवारी (ता. २२) नंदीस्टॉप येथे एक कॅमेरा बसवून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. शहरातील हे सर्व कॅमेरे वायफायने जोडले जाणार आहेत.

शहरात २५ ठिकाणी कॅमेरे; कॅमेऱ्यांसाठी वायफायचा वापर; आज चाचणी

लातूर - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेले लातूर शहरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे आता लवकरच बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शहरातील सुरक्षिततेसाठी २५ ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. शहराच्या दृष्टीने महापालिकेचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. यात गुरुवारी (ता. २२) नंदीस्टॉप येथे एक कॅमेरा बसवून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. शहरातील हे सर्व कॅमेरे वायफायने जोडले जाणार आहेत.

कॅमेऱ्यांची केवळ चर्चाच
पुणे मुंबईसारखे शहरात ठिकठिकाणी लातूर शहरात कॅमेरे बसविण्याची महापालिकेत केवळ चर्चाच होत होती; पण त्याला अंतिम रूप मात्र येत नव्हते. त्यामुळे लातूरची सुरक्षा कॅमेऱ्यात कैद होणार की नाही याबाबत शंका होती; पण शेवटी या प्रकल्पाला अंतिम रूप आले. यातूनच येत्या काही दिवसांत शहराची सुरक्षा कॅमेऱ्यात कैद होणार आहे.

वायफायला पर्याय वायरिंग
शहरात २५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यात पोलिस अधीक्षक कार्यालय ते राजीव गांधी चौक, तसेच दयानंद महाविद्यालय ते आंबेडकर चौक या रस्त्यावर वायरिंगचे कामही करण्यात आले आहे; पण हे कॅमेरे वायफायचा वापर करून चालविले जाणार आहेत. त्याला पर्याय म्हणून वायरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंचवीस ठिकाणी कॅमेरे
शहरात २५ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यात नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पीव्हीआर चौक, दयानंद महाविद्यालय, शिवाजी चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय, नवीन रेणापूर नाका, रेल्वे स्टेशन, अशोक हॉटेल, महापालिका, गांधी चौक, बसस्थानक, गंजगोलाई, सुभाष चौक, मस्जिद रोड, शाहू चौक, आंबेडकर चौक, सम्राट चौक, गूळ मार्केट, बाभळगाव नाका, विवेकानंद चौक, बसवेश्‍वर चौक, वसंतराव नाईक चौक, कन्हेरी, राजीव गांधी चौक व नंदीस्टॉपचा समावेश आहे. 

अधीक्षक कार्यालयातून नियंत्रण
शहरातील सुरक्षिततेवर पोलिसांचे नियंत्रण असते. त्यामुळे शहरात बसविण्यात येणाऱ्या या २५ कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष हे पोलिस अधीक्षक कार्यालयात असणार आहे. तेथे त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एका रूममध्ये बसून शहरात काय घडत आहे, याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. याचे सर्व नियंत्रण पोलिस अधीक्षक कार्यालयातून केले जाणार आहे. एका ठिकाणी बसून शहरावर लक्ष ठेवता येणार आहे. मोठ्या बंदोबस्ताच्या काळात याचा अधिक फायदा होईल. काही घटना घडल्या तर त्याची माहिती कळण्यासह मदत होईल.
- डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक.

शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नावीन्यपूर्ण कामांतर्गत हे काम करण्यात येत आहे. यासाठी एक कोटी ९२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महत्वाच्या २४ चौकांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर चौकांमध्ये कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
- रमेश पवार, आयुक्त, महापालिका.

शहरात दयानंद महाविद्यालय ते आंबेडकर चौक तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय ते राजीव गांधी चौक या रस्त्यावर वायर टाकण्यात आले आहे. शहरात २५ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वायरिंग ही केवळ पर्यायी व्यवस्था आहे. हे सर्व कॅमेरे वायफायने जोडले जाणार आहेत. कॅमेरे व सर्व साहित्य आले आहे. येत्या एक महिन्यात सर्व चाचण्या करून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होईल.
- जालिंदर मंडलिक, प्रकल्पप्रमुख, केल्ट्रॉन इलेक्‍ट्रॉनिक्‍स.

Web Title: latur security in camera