लातूरची सुरक्षा वाऱ्यावर

हरी तुगावकर
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात 21 कॅमेरे बंद; चौका-चौकांतील ध्वनिक्षेपक नावालाच

लातूर ः शहराच्या सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण हे कॅमेरे निकृष्ट दर्जाचे बसवल्याने ते सातत्याने बंद पडत आहेत. सध्या सणासुदीचे तसेच विधानसभा निवडणुकीचे दिवस आहेत. अशात शहरातील मुख्य रस्ता व मुख्य चौकातील 21 कॅमेरे बंद असून ते केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. हे कॅमेरे बंद असल्याने शहराची सुरक्षाच महापालिकेने वाऱ्यावर सोडली आहे. 

कोट्यवधीचा खर्च पाण्यात 
शहरात लावण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे हे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. महापालिकेच्या माध्यमातून शहरात 43 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण हे कॅमेरे निकृष्ट दर्जाचे बसवण्यात आल्याने ते सातत्याने बंद पडत आहेत. हे कॅमेरे सध्या शोभेच्या वस्तू बनले आहेत. कोट्यवधीचा खर्च एकप्रकारे पाण्यात गेला आहे. 

खांबावर लटकले ध्वनिक्षेपक 
शहरात महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच खांबावर ध्वनिक्षेपक बसवण्यात आले आहेत. चौकात वाहतुकीची कोंडी झाली किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिस नियंत्रण कक्षातून या ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यात येतात. पण हे ध्वनिक्षेपक केवळ नावालाच लावण्यात आले आहेत. एकदाही ते सुरू झाले नाहीत. यावरचा खर्चही वाया गेला आहे. 

कंत्राटदार कामही करेना 
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने एका कंत्राटदाराला दिले आहे. या कंत्राटदाराला केलेल्या कामाचे 13 लाखांचे बिल 2018 मध्ये मिळणे आवश्‍यक होते. पण महापालिकेने ते दिले नाही. गणेशोत्सव काळात यापैकी सात लाख रुपये दिल्याने त्याने काही कॅमेरे सुरू केले. पण सहा लाख रुपये न मिळाल्याने कंत्राटदार कामच करत नाही. त्यामुळे या कॅमेऱ्यांची दुरुस्तीच होत नाही. 

पोलिसांच्या सूचनेलाही केराची टोपली 
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याचा नियंत्रण कक्ष पोलिस अधीक्षक कार्यालयात आहे. या नियंत्रण कक्षात बसून कॅमेरा परिसरात काय सुरू आहे हे पोलिसांना पाहता येते. त्यामुळे हे कॅमेरे तातडीने सुरू करावेत, अशी सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी महापालिकेला वारंवार केली आहे. पण महापालिकेकडून या सूचनेला सातत्याने केराची टोपली दाखवली जात आहे. 

शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सव काळात दुरुस्त करून घेण्यात आले आहेत. उर्वरित कॅमेरे दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे कॅमेरे लवकरच दुरुस्त होतील. 
- संभाजी वाघमारे, उपायुक्त, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur security in risk