संप शिक्षकांचा अन्‌ शिक्षा मुलांना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

लातूर : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शहरातील बहुतांश शाळांनी बुधवारी अचानक पाठींबा दर्शविला. त्यामुळे नियमित वेळेवर सुरू झालेल्या शाळेला काही मिनिटांमध्येच सुटी देण्यात अाली. शाळेच्या या निर्णयामुळे दुरहून आलेल्या विद्यार्थी-पालकांची मोठी गैरसोय झाली. याबाबत अनेक पालकांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली.

सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करा, शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करा, निकषपात्र शाळांना अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी थांबवा यासारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी (ता. 8) शहरातील अनेक मराठी शाळांनी या संपाला पाठींबा दिला. त्यामुळे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना काही मिनिटांमध्येच पून्हा घराकडे परतावे लागले. अनेक मुलांना तर चक्क पायी चालत घरी जावे लागले. 

अनेक विद्यार्थी स्कुल व्हॅन, रिक्षा अशा वाहनांतून शाळेत ये-जा करतात. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात सोडून ही वाहने परत गेली. ठरलेल्या वेळेनूसारच ही वाहने शाळांच्या आवारात येतात; पण शाळांनी अचानक सुटी दिल्याने मुलांनी घराकडे परतायचे कसे, असा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक पालकांना आपली कामे सोडून शाळांमध्ये यावे लागले. शाळांनी किंवा शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांनी अचानक अशा पद्धतीची भूमिका घेणे अयोग्य आहे, अशा शब्दांत पालक धनाजी जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शाळांच्या या भूमिकेमुळे शहरातील अनेक शाळांमध्ये सकाळी दहापासून शुकशुकाट पाहायला मिळाला.

Web Title: latur teachers on protest for there demand