लातूरचा पाणी प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर

water.jpg
water.jpg

लातूर  : ''लातूरच्या पाण्याचा प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर आहे,'' असे सांगतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी उजनीचे पाणी लातूरला देण्यासंदर्भात मात्र मौन पाळले. या विषयावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे लातूरला उजनीचे पाणी मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचे दिसत आहे.

लातूरला २०१६ मध्ये भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्य शासनाने तत्परता दाखवत लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लातूरला मंत्र्याची बैठक घेत अनेक आश्वासनेही दिली होती. यात उजनी धरणाचे पाणी लातूरला देण्यासंदर्भात एक आश्वासन होते. पण अद्याप त्या संदर्भात काहीही हालचाली सुरु झालेल्या नाहीत. काही दिवसापूर्वी अटल महाआरोग्य शिबिराच्या उदघाटनप्रसंगी देखील मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी हा विषय आपल्या भाषणात मांडला होता. त्यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी लातूरला पाणी देण्यासंदर्भात शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले होते. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र या विषयावर बोलणे टाळले होते.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविवारी लातूर दौऱयावर आले होते. त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी लातूरच्या पाणी प्रश्नावर दानवे यांना पत्रकारांनी छेडले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवणही त्यांना करून दिली. यावर्षी पुन्हा लातूरला भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासन उजनीचे पाणी लातूरला देणार का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर दानवे म्हणाले, ''भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. लातूरलाही त्याचा फायदा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. रेल्वे बोगीचा देशातील महत्वाचा प्रकल्प येथे होत आहे. मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वॉटरग्रीड प्रकल्प मंजूर केला आहे. प्रकल्प मंजूर झाला म्हणजे लगेच कामे पूर्ण होत नाहीत. त्याला वेळ लागतो. लातूरचा पाणी प्रश्न देशभर गाजला होता. भाजप सरकारनेच तातडीने रेल्वेने पाणी देवून मदत केली. लातूरचा प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर आहे. बॅकलॉग भरून काढला जाईल. '' , असे त्यांनी स्पष्ट केले. पण उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन पाळले. त्यामुळे उजनी धरणाचे पाणी लातूरला मिळण्याची शक्यता धूसरच दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com