लातुरात १५ जानेवारीपासून आठवड्यातून दोनदा पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

लातूर - शहरातील विविध भागांत चिल्ड्रन्स पार्क विकसित करणे, विविध ठिकाणच्या १४ चौकांत सिग्नल बसविणे, चौक व रस्त्यांना नावे देणे, कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत लाभ देण्यासह नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरातील पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे व मांजरा धरणावरील विद्युत ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून १५ जानेवारीपासून आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे ठरले. 

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची बुधवारी (ता. २१) बैठक झाली. सभापती विक्रांत गोजमगुंडे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत धनेगावच्या (ता. केज) धरणाजवळील विद्युत ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून घेण्याच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. शहरातील पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्‍यक तेथे व्हॉल्व्ह बसवून किरकोळ कामे पूर्ण करणे, १५ जानेवारीपासून आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करून २६ जानेवारीपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याची सूचना सभापती गोजमगुंडे यांनी केली.

शहरात विविध भागांत चिल्ड्रन्स पार्क विकसित करून लहान मुलांसाठी खेळांचे साहित्य बसविण्याचे व शहरातील विविध रस्ते व चौकांना नावे देण्यासाठी समिती गठित करून निर्णय घेण्याचे ठरले. स्व. नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावे साहित्य, कला, नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतास दरवर्षी ५१ हजार रुपये व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्याचा निर्णय झाला. यंदाचा कार्यक्रम जानेवारीत घेण्याचे ठरले. अण्णा भाऊ साठे यांच्या नावे कमान उभी करण्यास, तसेच कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत १२ व २४ वर्षांनंतरचे लाभ देण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील १४  चौकांत ट्रॅफिक सिग्नल बसविण्यास मंजुरी मिळाली. 

ख्रिस्तजन्मोत्सवास निधी देणे, साहित्य संमेलन व विभागीय क्रीडा स्पर्धा, सत्यशोधक परिषदेस निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. नगरसेवकांनी सुचविलेल्या शहरातील विविध भागांतील विकासकामांना चर्चेविनाच मंजुरी देण्यात आली. या बैठकीस आयुक्‍त रमेश पवार, उपायुक्‍त संभाजी वाघमारे, सभागृहनेते रविशंकर जाधव, स्थायी समिती सदस्या प्रा. स्मिता खानापुरे, सुनीता चाळक, स्नेहलता अग्रवाल, इरशाद तांबोळी, सुरेखा इगे, कविता वाडीकर, सदस्य सुरेश पवार, नरेंद्र अग्रवाल, ॲड. समद पटेल, राजकुमार जाधव, राजा मणियार, चंद्रकांत चिकटे, कैलास कांबळे, महादेव बरूरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Latur water twice a week from January 15