लातूरला मिळणार ‘उजनी’चे पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

लातूर - उजनी धरणातून लातूरला पाणी मिळावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. तिला अखेर यश आले असून, या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३६५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. 

लातूर - उजनी धरणातून लातूरला पाणी मिळावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. तिला अखेर यश आले असून, या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३६५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून या मागणीसाठी येथील ‘जलाग्रही’ या व्यासपीठाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू केले होते. या व्यासपीठाच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी (ता. १०) औरंगाबाद येथे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. या वेळी खासदार सुधाकर शृंगारे उपस्थित होते. या योजनेला आता मंजुरी मिळाली आहे.

औरंगाबादेत झालेल्या मराठवाडा टंचाई आढावा बैठकीत लोणीकर यांनी याबाबतची घोषणा केली. येत्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील असेही त्यांनी आश्वस्त केले आहे. उजनी धरणातून बंद पाइपलाइनद्वारे मांजरा धरणात हे पाणी सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी ३६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पुढील २ महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

येत्या ६ महिन्यांच्या आत प्रत्यक्ष कामास सुरवात करण्याचे लोणीकर यांनी जाहीर केले आहे. पुढील १५ दिवसांत लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या हरकती व सूचना मागविण्यात येऊन अंतिम आराखडा मंजूर करण्यात येणार आहे. उजनीचे पाणी लातूरला देताना सर्व प्रकारच्या कायदेशीर तरतुदी पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आल्याचे लोणीकर यांनी स्पष्ट केल्याची माहिती ‘जलाग्रही’ व्यासपीठाच्या वतीने देण्यात आली आहे.

या मागणीसाठी ‘जलाग्रही’तर्फे मिस्ड कॉल अभियान राबविले होते. यात ४३ हजार लातूरकरांनी मिस्ड कॉल केले होते. अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी मान्य केल्याबद्दल ‘जलाग्रही’तर्फे शासनाचे आभार मानण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur will receive Ujani water