भावी अध्यक्षांचे खरे ठरले भाकीत! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

लातूर - जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते व भावी अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे असे रामचंद्र तिरुके यांनी ता. 29 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना एका चिठ्ठीवर सही करून निवडणुकीचा अंदाज वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. त्यामुळे एखाद्या राजकारण्याचा अंदाज कसा ठरला, याची जिल्हा परिषदेत चर्चा सुरू आहे. 

जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू असताना प्रत्येक जण आपआपले अंदाज वर्तवत होते. कोणी कॉंग्रेसचे पारडे जड आहे तर कोणी भाजप आघाडी घेईल, असे सांगत होते. कोणी फोर्टी प्लस तर कोणी थर्टी प्लस असा अंदाज व्यक्त करीत होते. गटनेते रामचंद्र तिरुके यांनी ता. 29 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना निवडणुकीचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज एका चिठ्ठीवर लिहून ठेवण्यात आला होता. त्यावर श्री. तिरुके यांनी सही केली होती. तसेच तीन साक्षीदारांच्या सह्याही त्यावर घेण्यात आल्या होत्या. यात आर. जी. गायकवाड, अभिमन्यू मोरे, मारोतीराव मुंडे यांच्या सह्या आहेत. यात श्री. तिरुके यांनी भाजपला 32 ते 36, कॉंग्रेसला 15 ते 18, राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन ते चार, शिवसेनेला दोन ते चार, तर अपक्ष एक किंवा दोन निवडून येतील, असा अंदाज वर्तविला होता. निवडणुकीच्या निकालानंतर हा अंदाज खरा ठरल्याचे दिसत आहे. कारण भाजपला 36, तर कॉंग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पाच, शिवसेना एक, तर अपक्ष एक विजयी झाला आहे. श्री. तिरुके दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अंदाजाची ही चिठ्ठी सध्या जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय बनली आहे. 

Web Title: latur zp bjp