शहरात लॉजची झाडाझडती

Laudge
Laudge

औरंगाबाद - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेण्यात आलेल्या अमोल काळे याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून कर्नाटक पोलिसांचाही तपास सुरू आहे. त्यासाठी कर्नाटक पोलिसांची चार लोकांची टीम शहरात तळ ठोकून आहे. त्यांनी शहरातील लॉजसह इतर ठिकाणी तपास सुरू केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कर्नाटकमध्ये कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली मोडस्‌ ऑपरेन्टी सारखी असल्याने कर्नाटकच्या विशेष पोलिस पथकाचा शहरात तपास सुरू आहे. संशयित मारेकरी अमोल काळे याने दिलेल्या माहितीवरून कर्नाटक एसआयटीची टीम शहरात तपासणी करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जात आहे. सिटीचौक पोलिस ठाण्यात एटीएसच्या ताब्यात असलेल्या रोहित रेगे, नचिकेत इंगळे आणि अंजिक्‍य सुरळे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न कर्नाटक एसआयटीकडून केला जात आहे. दरम्यान, अमोल काळे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, औरंगाबाद शहरात अमोल हा कोणत्या व्यक्तीशी भेटला किंवा कसे याचीही माहिती घेण्याचे काम कर्नाटक एटीएसकडून सुरू आहे. शहरातील एटीएस कार्यालयात दिवसभर ‘एमएच १२’ पासिंगच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. पुणे पासिंगच्या गाड्यांमधून एटीएसचे पथक दाखल झाल्याची माहिती स्थानिक कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.

एटीएसकडून पंचांची शोधाशोध
चौथा शनिवार असल्याने कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे एटीएसला तपासात पंच म्हणून लागणाऱ्या साक्षीदारांची शोधाशोध दुपारपर्यंत सुरू होती. दरम्यान, घाटी रुग्णालयाकडेही दोन कर्मचाऱ्यांची लेखी मागणी करणारे पत्र घेऊन एटीएसचे अधिकारी दुपारी बाराच्या सुमारास पोचले होते. मात्र, कर्मचारी उपलब्ध होऊ न शकल्याने अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे दोन पंचांची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘एनआयए’चे पथक शहरात
दाभोलकर हत्या प्रकरण; तसेच शहरात सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणात झालेल्या अटक सत्रानंतर शहरात शनिवारी (ता. २५) सकाळच्या विमानाने राष्ट्रीय तपास पथकाचे (आयएनए) काही कर्मचारी शहरात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या पथकाने औरंगाबादसह जालना येथेही जाऊन स्थळपाहणी केल्याची चर्चा दिवसभर पोलिस विभागात होती. मात्र, या पथकाबाबत कोणताही अधिकृत दुजोरा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाला नाही.

मित्रांचाही तपास 
डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला साथ देण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या तिघांच्या संपर्कात असलेल्या मित्र व ते ज्या ठिकाणी काम करतात अशा ठिकाणचीही तपासणी एटीएस पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. या तिघांचे बॅंकेचे डिटेल तसेच त्यांच्या व्यवहाराचीही माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com