महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी हैदराबादेतील नेत्यांचा ‘कानमंत्र’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

नगरपालिका, नगरपंचायतीसाठी ओवेसी बंधू राज्यात घेणार २५ सभा  दोन दिवस हैदराबादेत राज्यातील नेत्यांच्या झाल्या बैठका

नगरपालिका, नगरपंचायतीसाठी ओवेसी बंधू राज्यात घेणार २५ सभा  दोन दिवस हैदराबादेत राज्यातील नेत्यांच्या झाल्या बैठका

औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने मुस्लिमांसोबत, दलित ओबीसी समाजाची मते आपल्याकडे वळविण्यासाठी रणनीती आखली आहे. राज्यातील आगामी नगरपालिका, नगरपंचायती, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हैदाराबादेतील पक्षाचे मुख्यालय ‘दारुस सलाम’ येथे शनिवारी आणि रविवारी (ता. सहा व सात) दोन स्वतंत्र मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील कोअर कमिटी सदस्य, नेत्यांना काही ‘खास कानमंत्र’ देऊन राज्यातील निवडणुका लढविण्यावर शिक्कामोर्तब केले.

नगरपालिका, नगरपंचायती, मुंबई महापालिकेसाठी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी राज्यभरात पंधरा, तर पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे दहा सभा घेणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत राज्यात निवडणुकीचे वातावरण तापण्याची शक्‍यता आहे. एमआयएमने नांदेड, औरंगाबाद महापालिकेत लक्षणीय यश मिळविले. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन आमदार निवडून आले, तर इतर उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली. यामध्ये मुस्लिम आणि दलित समाजाची मते या पक्षाला मिळाली होती. आता पक्षाने ओबीसी समाजाच्या मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. यातील मुस्लिम दलित समाज ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक ‘व्होट बॅंक’ मानली जाते. त्यामुळे एमआयएमने ही मते एकगठ्ठा कशी मिळतील यासाठी रणनीती तयार करण्यास सुरवात केली आहे. भाजप, शिवसेनेकडील मते एमआयएमला मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे राज्यात येत्या काळात यशस्वी व्हायचे असले तर दलित, मुस्लिम, ओबीसी मते कशी मिळविता येतील यावर हैदराबादेत चांगलाच खल झाला. 

 

ओवेसी बंधूंचे राज्यभर दौरे

नगरपालिका, नगरपंचायती आणि मुंबई महापालिकेसाठी ओवेसी बंधूंच्या राज्यात जवळपास २५ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी १५, तर आमदार अकबरुद्दीन ओवेसी १० सभा घेणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त सभा या मुंबई महापालिकेसाठी असणार आहेत. कोणत्या नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये दलित-मुस्लिम मते जास्त आहेत, याची सर्व माहिती काढून या सभांचे नियोजन आतापासूनच करण्यास सुरवात केलेली आहे. राज्यात कोणत्या मुद्यांवर सरकारवर हल्ला करायचा यासाठी हैदराबादेतील बैठकीत चर्चा करण्यात आली. 

 

मुंबई महापालिकेसाठी सर्वाधिक प्रयत्न

एमआयएमची संपूर्ण राज्यासाठी हैदराबादेत एक बैठक घेण्यात आली. मात्र, मुंबई महापालिकेसाठी एक विशेष स्वतंत्र बैठक झाली. मुंबईसाठी पक्षाचे नेत अकबरुद्दीन ओवेसी, आमदार वारिस पठाण सर्वाधिक लक्ष घालणार आहेत. अकबरुद्दीन ओवेसींच्या जास्तीत जास्त सभा या मुंबईत होतील. तेथे दलित-मुस्लिम वॉर्डातील उमेदवार आतापासूनच शोधण्यावर भर देण्यात येत आहे. तशा सूचनाच पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी नेत्यांना दिल्या आहेत. 

 

काँग्रेस-राष्ट्रवादीची वाढती धाकधूक

एमआयएमने काँग्रेस राष्ट्रवादीची हक्काची दलित मुस्लिमांच्या व्होट बॅंकेत सुरुंग लावल्याने काँग्रेस राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे. जेथे जास्त दलित मुस्लिम मते आहेत तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका सहन करावा लागल्याचे नांदेड, औरंगाबाद महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत दिसून आलेले आहे. औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी येथे तर एमआयएने आपल्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केल्याने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडालेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक संवादयात्रेत सर्वाधिक टीका ही एमआयएमवर होताना दिसते, तर राष्ट्रवादीचे नेतेही एमआयएमवर तीव्र टीका करताना दिसतात.  

मराठवाड्यात डिसेंबर २०१६ मध्ये जवळपास ४०, तर फेब्रुवारी २०१७ मध्ये आठ नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर, वैजापूर, पैठण नगरपालिकांची मुदत डिसेंबरमध्ये, तर खुलताबादची फेब्रुवारी २०१७ मध्ये मुदत संपणार आहे. येथे जास्तीत जास्त उमेदवार दिले जाणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचीही चिंता वाढली आहे. 

महाराष्ट्रातील नगरपंचायती, नगरपालिका, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी दोन स्वतंत्र बैठका हैदराबादेत घेण्यात आल्या. यात महाराष्ट्रातील नेत्यांची उपस्थिती होती. राज्यात पक्षाच्या नेत्यांच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर आमचा भर राहील. आम्ही सर्व निवडणुका सर्वशक्तीनिशी लढूत.

- इम्तियाज जलील, आमदार

इसिसच्या विरोधी १ ऑक्‍टोबरला मेळावा

‘इसिस’च्या विरोधात, समाजात जनजागृती करण्यासाठी १ ऑक्‍टोबर रोजी मुंबईत एमआयएमतर्फे मेळावा घेण्यात येणार आहे. असाच मेळावा हैदराबादेतही घेण्यात आला होता. मुंबईतील मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी संबोधित करणार आहेत.

Web Title: Leaders for elections in Maharashtra haidarabad 'kanamantra'