आलापूरच्या सिमेंट बंधाऱ्याला गळती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

माजलगाव, (जि. बीड) : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेल्या नवीन सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. यामुळे पहिल्यांदाच साचलेल्या पाण्यासह शासनाचा निधीही वाया गेला आहे. सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट केल्याचा आरोप आलापूरच्या ग्रामस्थांनी केला आहे. 

माजलगाव, (जि. बीड) : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेल्या नवीन सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. यामुळे पहिल्यांदाच साचलेल्या पाण्यासह शासनाचा निधीही वाया गेला आहे. सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट केल्याचा आरोप आलापूरच्या ग्रामस्थांनी केला आहे. सातत्याने दुष्काळाशी तोंड देणाऱ्या बीड जिल्ह्यात शासनाने अनेक योजना राबवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. गतवर्षी तालुक्‍यात एकूण 45 सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती; परंतु या बंधाऱ्यांचे थातूरमातूर काम करणाऱ्या कंत्राटदाराचे पितळ पहिल्यांदा पाणी साचताच उघड पडले आहे. 

आलापूर, बेलुरा ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत गावाजवळील गायरानावर सिमेंट बंधाऱ्याचे काम करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस झाल्याने या बंधाऱ्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणी साचले; परंतु नवीन सिमेंट बंधाऱ्याला गळती लागल्याने साचलेले पाणी वाहून जात आहे. बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला मोठ्या भेगा आहेत. यातून सतत पाणी वाहत असल्याने बंधारा कोरडाच राहणार आहे. काम सुरू असतानाच चांगले काम करण्याच्या सूचना देऊनही संबंधित कंत्राटदाराने लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या कामाची चौकशी करून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे हनुमान फपाळ, अर्जुनराव फपाळ, नारायण फपाळ, कचरू फुलवरे, बालासाहेब फपाळ, रामभाऊ घेवारे, सत्यनारायण फपाळ, नाना धुमाळ आदींनी सांगितले. सिमेंट बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून त्वरित दुरुस्ती करावी, ग्रामस्थांच्या वतीने या मागणीचे निवेदन गुरुवारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती हनुमान फपाळ यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leakege in alapur dam